तटकरे कुटुंबियांची बदनामी सहन करणार नाही : राष्ट्रवादीचा इशारा - will not tolerate defamation of tatkare family warns ncp | Politics Marathi News - Sarkarnama

तटकरे कुटुंबियांची बदनामी सहन करणार नाही : राष्ट्रवादीचा इशारा

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

पेण नगरपालिकेचे गटनेते व मुख्याधिकारी यांच्यातील वाद न्यायप्रविष्ट आहे. या वादाचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही, असा दावा जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी केला. 

अलिबाग : खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे भाजपचे कारस्थान सहन केले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी पेण येथे दिला.

मागील काही दिवसांपासून पेण नगरपालिका मुख्याधिकारी विरुद्ध सत्ताधारी असा वाद विकोपाला गेला आहे. यामध्ये भाजपाचे नेतेमंडळी काहीही कारण नसताना तटकरे कुटुंबियावर एका पाठोपाठ एक आरोप करून बदनामी करीत असल्याचा आरोप करत रायगड राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी शुक्रवारी ( ता.30) रोजी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत निषेध केला.

या पत्रकार परिषदेला शिवसेना सल्लागार बबनदादा पाटील, राष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष सुरेश लाड, काँग्रेसचे पनवेल शहर अध्यक्ष आर. सी. घरत, शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर, संतोष शृंगारपुरे, प्रशांत पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे , महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, माजी नगरसेवक जितेंद्र ठाकुर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दयानंद भगत, राष्ट्रवादीचेेे पेण शहर उपाध्यक्ष विशाल बाफना, प्रसाद देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेेना व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लाड म्हणाले की,  पेणच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गटनेते व मुख्याधिकारी यांच्यातील वाद न्याय प्रविष्ट आहे. या वादाचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही. महिलांशी वागताना योग्यरीत्या वागावे माता-भगिनींचा योग्य आदर राखावा असाही सल्ला यावेळी लाड यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी  गुरुवारी पेण येथे बेकायदेशीरपणे काढलेला मोर्चा व घेतलेल्या सभेविरोधात पोलीस प्रशासन कारवाई करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. देवेंद्र फडवणीस हे राज्यात मुख्यमंत्री होते तसेच त्या वेळेला केंद्रातही भाजपची सत्ता होती. तरीही देवेंद्र फडवणीस व भाजपने पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना न्याय मिळवून दिला नाही. या संदर्भात खासदार तटकरे यांनी लोकसभेत आवाज उठवून सदरची बँक विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे व त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे सल्लागार बबनदादा पाटील म्हणाले की, राज्यातील सत्ता हातातून गेल्याने भाजपचे नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. हे नेते प्रकाशझोतात राहण्याकरिता महाआघाडीच्या नेत्यांवर खोटे व बिनबुडाचे आरोप करीत आहेत. महाआडीचे सरकार लवकरच पडेल अशी आरोळी ठोकतात. या भाजपच्या वैफल्यग्रस्त नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरामेळाव्यात हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे खुले आव्हान दिले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बाटगा माणूस असल्याची अशी टीका बबन पाटील यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख