निमित्त न्यायालयातील हजेरीचं अन् बार महापालिका निवडणुकीच्या शक्तीप्रदर्शनाचा..! - mns chief raj thackeray will appear in vashi court tomorrow | Politics Marathi News - Sarkarnama

निमित्त न्यायालयातील हजेरीचं अन् बार महापालिका निवडणुकीच्या शक्तीप्रदर्शनाचा..!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

नवी मुंबई महापालिकेच्या रणधुणाळी सुरू असताना आता राज ठाकरे उद्या बेलापूर न्यायालयात येत आहेत. या निमित्तानं जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी मनसेने केली आहे. 

नवी मुंबई : वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट बजावले आहे. त्यामुळे राज ठाकरे उद्या (ता.6) बेलापूर न्यायालयात हजर राहणार आहेत. या निमित्तानं मनसेने नवी मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीच्या तोंडावर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. 

वाशीमध्ये राज ठाकरे यांनी 26 जानेवारी 2014 रोजी भडकावणारे भाषण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची बेलापूर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 

या प्रकरणी अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे आता बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट बजावले आहे. त्यामुळे उद्या (ता.6) सकाळी 11 वाजता राज ठाकरे नवी मुंबईत दाखल होणार आहेत. राज ठाकरे येणार म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत करण्याचे ठरवले आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा मनसेला होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. यासाठी सोशल मीडियावरुन मनसैनिकांना आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी स्वतःवर शेकडो गुन्हे घेतलेला पहिला नेता...महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे...शनिवार दि. ०६ फेब्रुवारी २०२१ दुपारी १२ वाजता...स्थळ : रेस्ट हाऊस कोर्ट नाका ठाणे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख