नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करणार:  मंदा म्हात्रे  

राजकारणात हत्ती होऊन लाकडे वाहण्यापेक्षाखाण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी, अशा शब्दांत म्हात्रे यांनी त्यांच्या विरोधकांना टोला लगावला.
Manda_Mhatre.
Manda_Mhatre.

जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी "सरकारनामा'ला  दिलेल्या विशेष  मुलाखतीत  केले.

बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच बुद्धमूर्ती अशी प्रेक्षणीय स्थळे तयार करणार असल्याचे म्हात्रे यांनी या वेळी सांगितले. राजकारणात हत्ती होऊन लाकडे वाहण्यापेक्षा  खाण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी, अशा शब्दांत म्हात्रे यांनी त्यांच्या विरोधकांना टोला लगावला. 


गेली पाच वर्षे जनतेच्या निरंतर निःस्वार्थी भावनेने केलेल्या सेवेमुळे पक्षाने माझ्यावर विश्‍वास ठेवून, पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे जनतादेखील पुन्हा काम करण्याची संधी देईल, असा विश्‍वास म्हात्रे यांनी या वेळी बोलून दाखवला. आगामी पाच वर्षांत नवी मुंबईचा होणारा विकास त्या कशा पाहतात. त्यांच्याच शब्दांत...


पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्याने काय वाटते?
जेव्हा एखादी व्यक्ती नगरसेवक अथवा आमदार झाल्यास त्याने लोकांचे प्रश्न नेहमी सोडवले, पक्षाने दिलेला कार्यक्रम प्रामाणिकपणे राबवला, तर अशा लोकप्रतिनिधींचे कोणीच तिकीट कापू शकत नाही. कोकणात आगरी समाजाची मी एकमेव महिला लोकप्रतिनिधी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये खूप विचार करून, स्थानिक पातळीवर चौकशी करून उमेदवारी दिली जाते. पक्षाने ही सर्व माहिती घेऊनच माझी उमेदवारी निश्‍चित केली. 


गावठाण विस्ताराचा प्रश्‍न कधी सुटणार?
बेलापूरच्या ग्रामस्थांचा गावठाण विस्ताराचा प्रश्न महत्त्वाचा आहे. गेली अनेक वर्षे याबाबत लढा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसोबत वारंवार बैठका घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. गावठाणांच्या शेजारी 200 मीटरची सीमा निश्‍चित करावी. या हद्दीतील घरे नियमित करण्यासाठी आम्हाला माफक दर आकारावा. ऐरोलीत 500 रुपये दराने शिवकॉलनी आम्ही तयार केली आहे. येथील रहिवासी बाहेरून येऊन या ठिकाणी स्थायिक झालेले होते. तरीदेखील त्यांना आम्ही न्याय मिळवून दिला. हे तर आमचे प्रकल्पग्रस्त आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना आम्हाला मालमत्ता कार्ड द्यायचे आहे. लोकांनी कायद्याच्या चौकटीत बसतील अशी बांधकामे करावीत.

जलवाहतूक कधी सुरू होणार?
आत्तापर्यंत 200 कोटी रुपयांचा निधी आणून समुद्रकिनाऱ्याचा विकास केला आहे. 12 कोटी रुपये खर्च करून जेटी तयार केल्या आहेत. 120 कोटी रुपयांची नवी जलवाहतूक नेरूळपासून सुरू होणार आहे. जलवाहतुकीमुळे अनेकांचा रस्तेवाहतुकीवर खर्च होणारा पैसा व वेळेची बचत होणार आहे. सरकारी परवानग्या रखडल्यामुळे प्रकल्पाला वेळ लागला; मात्र आता सर्व परवानग्या मिळत आहेत. त्यामुळे नवी मुंबईच्या जलवाहतुकीला लवकर प्रारंभ होईल.

सारसोळे जेट्टीचा विकास कधी होणार?
सारसोळे जेट्टीच्या कामाचा निधी मंजूर होईल पाच वर्षे झाली; मात्र कांदळवनांच्या अडथळ्यामुळे हा विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. 2005 ला विधान परिषदेची आमदार असताना अनेक कोळीवाड्यांमध्ये मच्छीमारांसाठी जेट्टी तयार केल्या.

कूकशेतचा विकास कसा झाला?
एमआयडीसीतून गावाच्या स्थलांतरानंतरही नेरूळच्या कूकशेत गावाचे पुनर्वसन केले नव्हते; परंतु भाजप सरकारच्या काळात कूकशेत गावाचा विकास केला. ग्रामस्थांना मुद्रांक नोंदणी शुल्क सरकारकडून माफ करून घेतले. तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वांना नोटिसा बजावल्या होत्या. त्या वेळी ग्रामस्थांमध्ये घबराट होती. मात्र मी वारंवार पाठपुरावा करून कूकशेतवासीयांचे करार करून त्यांना घराचा मालकी हक्क मिळवून दिला.

फ्री होल्डचा फायदा कोणाला?
सिडकोने नवी मुंबईत तयार केलेल्या अनेक इमारतींचे करार संपुष्टात आले आहेत. करार संपल्यामुळे पुन्हा सिडकोकडे बाजारभावानुसार करार करून पैसे भरावे लागले असते. मात्र आम्ही सरकारकडून फ्री होल्ड करून घेतल्यामुळे आता 60 वर्षांच्या कराराची मुदत 99 वर्षांपर्यंत गेली आहे. तसेच करार शुल्कही कपात केल्यामुळे कमी रकमेत पुन्हा 99 वर्षांच्या मुदतीवर भाडेकरार वाढवून घेता येणार आहे. फ्री होल्ड झाल्यामुळे रहिवासी, वाणिज्यिक, व्यावसायिक, सामाजिक सर्व प्रकारच्या बांधकामांना फायदा झाला.


ज्येष्ठ नागरिकांचा पूर्ण वेळ सांभाळ करणार
अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी आरोग्य कार्यशाळा घेते. घरची हलाखीची परिस्थिती असेल तर ज्येष्ठांना आरोग्याच्या तक्रारी घरातील नातेवाईकांकडे करता येत नाहीत. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही आरोग्य कार्यशाळा असते. बेलापूर मतदारसंघात अनेक विरंगुळा केंद्र आहेत. सर्व माझ्या संपर्कात असून, मी माझ्या आई-वडिलांप्रमाणे त्यांचा सांभाळ करते. त्यांनाही माझा भावनिक आधार वाटतो. जेव्हा राजकारणातून निवृत्त होईन, तेव्हा याच ज्येष्ठ नागरिकांचा पूर्ण वेळ सांभाळ करणार आहे.

शिवसैनिकांची मदत होते का?
बेलापूर मतदारसंघात मला सर्व शिवसैनिक मोठ्या मनाने मदत करीत आहेत. माझ्या रोजच्या प्रचारात सर्व शिवसैनिक हिरिरीने सहभाग घेतात. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी फोनवरून विचारपूस केली. उद्धव ठाकरे यांनी माझ्या उमेदवारीकरिता प्रयत्न केले होते. एवढी मोठी व्यक्ती आपल्यासाठी प्रयत्न करते. असे असल्यावर मीही त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत आशीर्वाद घेतला.

नवी मुंबईत किती निधी आणला?
आत्तापर्यंत राज्यात एवढा कोणाला मिळाला नसेल एवढा निधी विकासकामांसाठी नवी मुंबईत मी माझ्या कारकिर्दीत आणला आहे. नवी मुंबईच्या जनतेसाठी पुरेपूर कसा फायदा होईल हे मी गेल्या पाच वर्षांत पाहिले आहे. आपण ज्या खुर्चीत बसलो आहोत. त्या खुर्चीतून काही काम झाले नाही, तर अशा खुर्चीत बसून काय फायदा?  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com