अर्णव गोस्वामीच्या निमित्ताने अलिबाग न्यायालयात घडला असाही `इतिहास` - History made in Alibag court due to arrest of Arnav Goswami | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णव गोस्वामीच्या निमित्ताने अलिबाग न्यायालयात घडला असाही `इतिहास`

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

जिल्हा कोर्टात काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ वकिलांच्या माहितीनुसार रात्री 11.45 वाजेपर्यंत कोर्टाचे कामकाज सुरू राहिल्याची पहिलीच घटना होती.

अलिबाग : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता. 4) अटक करून अलिबागमध्ये आणले होते. त्यानंतर याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुख्य न्याय दंडाधिकारी सुनैना पिंगळे यांच्यासमोर युक्तिवाद सुरू होता. देशभराचे लक्ष लागलेल्या या प्रकरणाच्या या युक्तिवादासाठी तब्बल आठ तासांहून अधिक वेळ लागला. अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात हा सर्वांत लांबलेला युक्तिवाद ठरला आहे.

जिल्हा कोर्टात काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ वकिलांच्या माहितीनुसार रात्री 11.45 वाजेपर्यंत कोर्टाचे कामकाज सुरू राहिल्याची पहिलीच घटना होती. संवेदनशील प्रकरणात संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर 24 तासांच्या आत कोर्टासमोर हजर करणे आवश्‍यक होते. त्यात पोलिसांनी केलेल्या कोठडीच्या मागणीवर प्रतिवाद करताना आरोपीच्या वकिलांनी कडवा प्रतिकार करत युक्तिवाद लांबवत नेला. प्रमुख आरोपी अर्णब गोस्वामी यांचे वकील ऍड. अबदाद पोंडा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दीड तासाहून जास्त वेळ युक्तिवाद केला. तीनही आरोपींचे वेगवेगळे वकील, पोलिस, सरकारी वकिलांचा युक्तिवाद यामुळे हा कालावधी वाढतच गेला.

अर्णब यांना दुपारी 1 वाजता न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांनी केलेला मारहाणीचा आरोप सिद्ध करण्यासाठी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या गोंधळात खीपसा वेळ गेल्यानंतर न्यायालयाने वैद्यकीय अहवाल घेऊन येण्यास सांगितले होते. सायंकाळी 5 वाजता न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा व्हिडीओ कॉन्फरन्समधील युक्तिवादात इंटरनेट कनेक्‍टिव्हीटीसारख्या तांत्रिक अडचणींचा अडथळा होता. त्यामुळे युक्तिवाद रात्री उशिरापर्यंत लांबला. न्यायालयाने नंतर अर्णव यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यावर जामिनासाठी गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथे त्यांना गुरूवारी दिलासा मिळू शकला नाही. शुक्रवारीही त्यांच्या अर्जावर सुनावणी आहे. 

...म्हणून पोलिसांची मागणी फेटाळली
तपासिक अंमलदार तथा रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे ए. जे. शेख यांनी तीनही आरोपींना 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. सरकारी सहायक वकील ऍड. रूपेश महाकाळ यांनी युक्तिवाद करत महत्त्वाच्या तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती, परंतु अन्वय नाईक आणि त्याची आई कुमुद नाईक यांच्या मृत्यूशी थेट संबंध येत नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी करत पोलिसांचा युक्तिवाद फेटाळून लावला होता. त्याचबरोबर राहिलेली रक्कम परत देण्यासाठी सादर केलेली हरकत कायम ठेवून (under protest) पैसे जमा करण्याची हमी आरोपींकडून देण्यात आली होती. या सर्व युक्तिवादात मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी पोलिसांची मागणी फेटाळून लावली.

अटक बेकायदा : ऍड. अबदाद पोंडा
अर्णब गोस्वामीचे वकील ऍड. अबदाद पोंडा यांनी ही अटकच बेकायदा असल्याचा मुद्दा मांडला. ठेकेदाराने अर्णब गोस्वामी यांच्याकडे पैशांचा तगादा लावला होता. यामुळे नाईक यांच्या मृत्यूस आरोपींचा थेट संबंध येत नसल्याचा युक्तिवाद ऍड. अबदाद पोंडा यांनी मांडला. यासाठी त्यांनी विविध न्यायालयीन निवाड्यांचे दाखले कोर्टासमोर सादर केले होते.

पैसे उकळण्यासाठी अटक : ऍड. एन. ए. राऊत
प्रकरणातील दुसऱ्या क्रमांकाचे आरोपी फिरोज शेख यांचे वकील ऍड. एन. ए. राऊत यांनी आदीची प्रकरणे बंद करताना "अ' समरी अहवाल दाखल होऊन न्यायालयाने मंजूर केले आहे. यास अद्याप कोणीही अव्हान दिलेले नाही.

प्रकरणाची पुन्हा सुरुवात

आरोपींना झालेली अटक ही पैसे उकळण्यासाठी झाली असल्याचे म्हणणे मांडले होते. हा केवळ दिवाणी वाद, त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याचा काहीही संबंध येत नसल्याचा युक्तिवाद मांडला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख