गुंड गजानन मारणेच्या मुसक्या आवळण्याचे काम झालयं सुरू.. - police plans to take action against gangster Gajanan Marane | Politics Marathi News - Sarkarnama

गुंड गजानन मारणेच्या मुसक्या आवळण्याचे काम झालयं सुरू..

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

गुंडांना सोडणार नसल्याचा पोलिसांचा इशारा 

नवी मुंबई : मोक्का कोर्टातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तळोजा कारागृहाबाहेर बेकायदेशीररीत्या जमाव जमवून जंगी मिरवणूक काढून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यातील मारणे टोळीचा म्होरक्‍या कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह त्याच्या समर्थकांवर अखेर खारघर पोलिसांनी बुधवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे.

या आधी शहर पुणे पोलिस, तळेगाव दाभाडे पोलिस यांनीही मारणे याच प्रकाराबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. पुणे पोलिसांनी त्याला डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. आता त्याला परत या दोन गुन्ह्यांसाठी पोलिस अटक करू शकतात. याशिवाय तुरुंग पोलिस महानिरीक्षकांनी मिरवणूक कशी काय काढली, याची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे त्याचा अहवाल आल्यानंतर आणखी कारवाई होऊ शकते.

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कालच गुन्हेगारांना मोकळे सोडणार नसल्याचे सांगत त्यांचे आगामी काळात कसे हाल केले जातील हे पाहा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे अशा गुंड टोळ्यांविरोधात पोलिस आणखी कठोर पावले उचलतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.   

पुण्यातील मारणे टोळीचा म्होरक्‍या कुख्यात गुंड गजानन मारणे याची मोक्का कोर्टातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी सोमवारी सायंकाळी तळोजा कारागृहाबाहेर मारणे याच्या समर्थकांनी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता, तळोजा कारागृहाच्या गेटसमोर प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर या समर्थकांनी मारणे याची चारचाकीतून मिरवणुक काढत त्याचे कारागृहाबाहेर जंगी स्वागत केले. त्यानंतर त्याच्या वाहनांचा ताफा तळोजा कारागृह येथून थेट पुण्यापर्यंत एक्‍सप्रेस वे मार्गे पुण्यापर्यंत गेला. गजानन मारणे याच्या समर्थकांनी 300 पेक्षा जास्त चारचाकी गाड्या घेऊन सव्वाशे किलोमीटर मिरवणूक काढून गजा पुण्याचा किंग असल्याचे, तसेच पुणे शहरात रॉयल एन्ट्री असे व्हिडीओ स्टेटस ठेऊन समाजमाध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाज माध्यमात हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खारघर पोलिसांनी याची दखल घेतल बुधवारी दुपारी गुन्हा दाखल केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख