दबावामुळे नवी मुंबई महापौरपदाच्या शर्यतीतून विजय चौगुलेंची माघार?   - Navi Mumbai - Mayor election - Vijay Chaugule | Politics Marathi News - Sarkarnama

दबावामुळे नवी मुंबई महापौरपदाच्या शर्यतीतून विजय चौगुलेंची माघार?  

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

महापौरपदासाठी शिवसेनेकडून विजय चौगुले यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती; मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्यारात्री अचानक मुख्यमंत्र्यांनी चौगुलेंना बोलावून अर्ज न भरण्यास सांगितल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते.

नवी मुंबई : महापौरपदाच्या निवडीवरून शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतीत अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेल्या दबावतंत्राचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार असल्याची चर्चा आहे. 

महापौरपदासाठी शिवसेनेकडून विजय चौगुले यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती; मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्यारात्री अचानक मुख्यमंत्र्यांनी चौगुलेंना बोलावून अर्ज न भरण्यास सांगितल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. अखेर चौगुलेंवर दबाव वाढल्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
 
शिवसेनेने यापूर्वी कॉंग्रेसच्या मदतीने एकदा स्थायी समितीचे सभापतिपद जिंकले होते. महापौरपदाच्या निवडणुकीतही याच फॉर्म्युलाने महापौरपद काबीज करण्याचे स्वप्न कॉंग्रेसच्या मदतीने शिवसेनेने पाहिले होते. 

महापौरपदाचे मनसुबे पूर्ण होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नाराज नगरसेवकांना लक्ष्मीदर्शन करून गळही घालण्यात आली होती. शिवसेनेच्या ऑफरला नाराजांनीही होकार देऊन लक्ष्मी स्वीकारली होती. या घडामोडींमुळे तब्बल 25 वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना घाम फुटला होता. 

शिवसेनेचे मनसुबे उधळून लावण्यासाठी अशोक चव्हाणांपासून थेट शरद पवारांपर्यंत साकडे घालण्यात आले होते. अखेर दिल्ली दरबारातून फोन आल्याने मुख्यमंत्र्यांनी विजय चौगुलेंना उशिरा रात्री निवासस्थानावर बोलवून अर्ज न भरण्याची सूचना केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत विजय चौगुले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र ते नवी मुंबईबाहेर असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
 
शिवसेनेचे मनसुबे धुळीस 
एकीकडे राज्यात शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून राष्ट्रवादीशी जवळीक साधली जात असल्याचे सर्वश्रूत आहे. तर नवी मुंबईत राष्ट्रवादीने गड राखण्यासाठी भाजपच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेतल्याने शिवसेनेचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. 

फुटीर नगरसेवकांची पंचाईत 
शिवसेनेला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेससह कॉंग्रेस व भाजपच्या काही नगरसेवकांनी 25 लाखांपासून ते 50 लाखांपर्यंतच्या मोठ्या रकमा स्वीकारल्या होत्या; परंतु शिवसेनेने काढता पाय घेतल्याने आता दिलेल्या पैशांची पुन्हा वसुली सुरू झाली आहे. 

ऐन दिवाळीत लक्ष्मीदर्शन झाल्याने काहींनी पैसे खोपोली व खालापूरमध्ये जमिनीत गुंतवले आहेत. तर काहींनी खर्च केल्याने रकमा परत करण्याची पंचाईत झाली आहे. भाजपच्या एका नगरसेवकाकडे तटस्थ राहण्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडून तब्बल दीड कोटी रुपये देण्यात आल्याचे समजते; मात्र अद्याप ती रक्कम भाजपच्या अन्य पाच नगरसेवकांना न मिळाल्यामुळे पाचही जण सध्या त्या नगरसेवकाजवळ चकरा मारत असल्याचे समजते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख