नवी मुंबईतील `विस्थापित नेत्यां'नी आतापर्यंत लुबाडण्याचे काम केले - अनिल कौशिक

अनिल कौशिक
अनिल कौशिक

नवी मुंबई  : ``पक्षनेतृत्वाने विधानसभेची संधी दिली दिल्यास संधीचे नक्की सोने करू. नवी मुंबईतील विस्थापित नेत्यांनी आत्तापर्यंत गोर-गरीबांना, मध्यमवर्गीय व वचितांना लुबाडण्याचे काम केले आहे. कॉंग्रेसच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना चांगला पर्याय होऊ शकतो,'' असे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांनी सांगितले. 

माजी मंत्री गणेश नाईक कुटुंबियासमवेत भाजपवासी झाल्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस विखुरली गेल्याने बेलापूर मतदारसंघावर कॉंग्रेसने दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडीधर्म पाळून बेलापूर मतदारसंघ कॉंग्रेसला सोडावे या मागणीला कॉंग्रेसमधून जोर धरू लागला आहे. 

भाजपचा झंझावात रोखण्यासाठी कॉंग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांना रिंगणात उतरवले जाण्याची दाट शक्‍यता आहे. स्वच्छ प्रतिमा आणि पक्षातील ज्येष्ठत्व असल्याने कौशिक यांच्या उमेदवारीला सर्व कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पसंती असल्याचे समजते आहे. 

नाईक कुटुंबियांमुळे नवी मुंबईच्या राष्ट्रवादी एकाकी पडल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गणेश नाईकांसोबत राष्ट्रवादीचे 55 नगरसेवक गेल्यामुळे महापालिकेत राष्ट्रवादीचे अस्तित्व शुन्य झाले आहे. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक नगरसेवक अशोक गावडे आणि त्यांच्या कन्या नगरसेविका सपना गावडे या दोघांनी प्रवेश न केल्यामुळे राष्ट्रवादीतील नगरसेवक संख्या अवघी दोनवर येऊन ठेपली आहे. त्याउलट कॉंग्रेसकडे महापालिकेत दहा नगरसेवकांचे बल आहे. त्यापैकी बेलापूर मतदार संघात एकूण सात नगरसेवकांची ताकद कॉंग्रेसकडे आहे. यातील भगत गटाचे तीन नगरसेवक सोडल्यास चार नगरसेवकांची कौशिक यांना पसंती आहे. 

नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे बहुसंख्य तगडे व ज्येष्ठ पदाधिकारीही राष्ट्रवादीतून निघून गेल्याने स्थानिक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादीला उरण व ठाण्यातून ज्येष्ठ नेते बोलवावे लागत आहे. पक्षाची कार्यकारणीच बदलली असल्यामुळे राष्ट्रवादीतील सद्याच्या नेत्यांना पुन्हा अगदी बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांपासून ब्लॉक अध्यक्ष, तालुका व जिल्हा कार्यकारणी अशी नवीन पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी स्थापन करायला नव्याने कामाला लागावे लागणार आहे. 

यात लागणारा वेळ आणि विधानसभा निवडणूकांचा कालावधी पाहता तयारी कमी पडण्याची शक्‍यता असल्याने राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्‍यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे. त्याउलट राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा कॉंग्रेसकडे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची फळी तयार आहे. सोबतीला नगरसेवकांची ताकद असल्याने कौशिक यांचे पारडे जड झाले आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com