Navi Mumbai Corporation Elections in April
Navi Mumbai Corporation Elections in April

नवी मुंबईचे नगरसेवक लागले कामाला; पालिका निवडणुकीमुळे विकासकामांचा धडाका

राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेचा नगरसेवक होण्यासाठी या सार्वत्रिक निवडणुकीमध्येही जोरदार रस्सीखेच होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत राज्याप्रमाणेच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबवला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपला ही निवडणूक पुन्हा काटे की टक्कर अशीच होणार आहे.

नवी मुंबई  : एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात विकासकामांचा धडाका सुरू झाला आहे. गेली चार वर्षे गायब झालेले नगरसेवक पुन्हा एकदा प्रभागात अवतरले आहेत. बहुतांश प्रभागात रस्ते, गटारे, भूमिगत जलवाहिन्या, महानगर गॅस वाहिन्या, डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण असे तब्बल पाचशे कोटींच्या कामांची उद्‌घाटने करण्यात आली आहेत.

राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेचा नगरसेवक होण्यासाठी या सार्वत्रिक निवडणुकीमध्येही जोरदार रस्सीखेच होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत राज्याप्रमाणेच महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबवला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे भाजपला ही निवडणूक पुन्हा काटे की टक्कर अशीच होणार आहे. तसेच या निवडणुकीमध्ये मनसे उतरल्यास त्याचाही भाजपला जोरदार फटका बसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांतील नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात विकासकामांच्या उद्‌घाटनाचा धडाका लावला आहे. 

तसेच काही नगरसेवकांकडून महिलांसाठी खेळ पैठणीचा, हळदी-कूंकू, रांगोळ्या स्पर्धा, मुलांसाठी मैदानी आणि सांस्कृतिक कार्यक्रम, एकात्मतेचे दर्शन घडवणारे विविध प्रकारचे महोत्सव आयोजित करून प्रभागात स्वतःची अस्तित्वाची वातावरण निर्मिती करण्यावर विशेष भर दिला जात आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेटचे भव्य सामने आयोजित केले जात आहेत. काही नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागात केंद्र सरकारने तरुणांपासून अबालवृद्घांपर्यंत लागू केलेल्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या शिबिरांचे आयोजन करून हेल्थ कार्ड वाटप केले जात आहेत. 

अलीकडेच झालेल्या नाताळच्या पार्श्‍वभूमीवर काही नगरसेवकांनी ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. एप्रिल 2020 मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने नगरसेवकांच्या हातात आता अवघे दोन ते तीन महिने उरले आहेत. या अखेरच्या दिवसांत प्रभागात राहिलेली व उरलेली अर्धवट कामे पूर्ण करणे, फाईलवर मंजुरी मिळालेली कामे प्रत्यक्षात सुरुवात करणे, यामागे नगरसेवक सपाटून लागले आहेत.

शिवसेनेतर्फे बालपणीच्या खेळांचे आयोजन

शिवसेनेच्या सिवूड्‌स शाखेतर्फे विभागप्रमुख समीर बागवान यांनी लाहनपणी खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या स्पर्धांचे शनिवारी आणि रविवार असे दोन दिवस आयोजन केले आहेत. यात गोट्या खेळांपासून अगदी लांब उड्या, लगोरी, रस्सीखेच, अशा मैदानी गावठी खेळांचा समावेश आहे.

प्रभागांमध्ये पिकनिकचे वारे

गेल्या पाच वर्षांत विखुरलेल्या हौशी कार्यकर्ते व तरुणांना एकत्र करण्यासाठी काही नगरसेवकांकडून प्रभागातून सहलींचे आयोजन केले जात आहे. अबालवृद्ध असतील तर त्यांना अलिबाग, मुरूड-जंजिरा, अष्टविनायक दर्शन व तरुणांच्या समूहांना गोवा, महाबळेश्‍वर अशा सहली घडवून आणत आहेत. सध्या बहुतांश प्रभागात सहलींचे वारे वाहू लागले आहेत. नागरिकांकडूनही अशा नगरसेवकांचे कोडकौतुक करून स्वतः फुकट फिरण्याची मौजमजा लुटून घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com