उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे हिंदुत्व संपवले! : भाजपची टीका - uddhav thackeray finishes hindutwa from shivsena alleges BJP | Politics Marathi News - Sarkarnama

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे हिंदुत्व संपवले! : भाजपची टीका

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

राज्यभरात भाजपने आंदोलन करून राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली...

बदलापूर) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या दबावाला बळी पडून संपवले आहे. म्हणूनच त्यांच्या या आघाडी सरकारच्या राज्यात मदिरा सुरू आणि मंदिर मात्र बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची टीका भाजप आमदार किसन कथोरे यांनी केली.

महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे नागरिकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावीत, या मागणीसाठी शनिवारी (ता. 29) बदलापूर शहरात भाजपच्या पुढाकाराने "घंटानाद" आंदोलन करण्यात आले. यावेळी कथोरे यांनी राज्यातील महाआघाडी सरकारवर टीका केली.

बदलापूर पूर्वेकडील गांधी चौक, विवेक आनंद सोसायटीतील गणेश मंदिरासमोर, पश्‍चिमेकडील महालक्ष्मी मंदिर, हेंद्रे पाडा येथील साई श्‍याम मंदिर, बदलापूर गावामधील श्रीगणपती मंदिर, श्रीराम मंदिर आदी शहरातील विविध ठिकाणी हे "घंटानाद' आंदोलन करण्यात आल्याचे शहर अध्यक्ष संजय भोईर यांनी सांगितले. तर बदलापूर गावातील प्राचीन श्रीगणपती मंदिराच्या प्रांगणात आमदार किसन कथोरे यांनी घंटानाद केला.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हिताचे निर्णय या आघाडी सरकारमध्ये घेतले जात आहेत. त्यातलाच एक भाग म्हणजे दारू विक्री सुरू करून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला फायदा करून घेतला आहे. मात्र मंदिर बंद ठेवून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व संपवायला घेतल्याची टीका आमदार किसन कथोरे यांनी केली. यावेळी मंदिरा समोर उभे राहून "उद्धवा दार उघड उद्धवा, उद्धवा हा कोणता न्याय, दारूची दुकाने बंद आणि मंदिरं बंद', अशा अनेक घोषणा देण्यात आल्या.

पुण्यातही भाजपचे आंदोलन

पुणे शहर भाजपतर्फे सारसबाग गणेश मंदिरा बाहेर शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे,आमदार सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.

मंदिरे व धार्मिक स्थळे उघडावीत, सरकारला जाग यावी, डोळे उघडावेत यासाठी घंटानाद करताना घोषणाबाजी करण्यात आली.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, " पुण्यातील प्रमुख आंदोलन सारसबाग येथे झाले असले तरी शहरात जवळपास 200 ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. लाॅकडाऊन मधून सर्व आस्थापन, माॅल, जीम सुरू झालेले असताना धार्मिक स्थळ मात्र बंद आहेत. राज्य सरकारने त्वरीत मंदिरे दर्शनासाठी खुले करावीत याकडे लक्ष वेधले आहे.``

आंदोलन करताना " दार उघडा उद्धवा दार उघड... असे म्हणत गोंधळ घालण्यात आला. मुरलीधर मोहोळ, मुळीक यांनी टाळ वाजवून यात सहभाग घेतला. यावेळी "देवा या सरकारला सद्बुद्धी दे" अशी घोषणाबाजी करण्यात आली.

खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत ओंकारेश्वर मंदिर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी बापट म्हणाले, "राज्य सरकारने जीम, माॅल, दुकाने उघडण्यास परवानगी दिली. दारूची दुकानेही सुरू केली. मात्र, मंदिर बंद आहेत. आपल्याला कोरोनाशी घाबरून जमणार नाही, सावधगिरीने समोर गेले पाहिजे. मंदिरांत दर्शन घेतल्याने माणूस आनंदी रहातो, मन स्थिर रहाते, अध्यात्मिक शक्ती मिळते असे आम्ही मानतो, त्यामुळे मंदिरे सुरू झाली पाहिजेत. यासाठी सरकारने लवकर नियमावली तयार करून धार्मिक स्थळे खुली करावीत. अन्यथा आम्हाला मंदिर सत्याग्रह करावे लागेल, असा इशारा ही बापट यांनी दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख