राष्ट्रवादी-शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; तिघांना अटक - NCP-Shiv Sena workers clashed; Three arrested | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी-शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; तिघांना अटक

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 6 जानेवारी 2021

हाणामारीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भिवंडी/वज्रेश्‍वरी : भिवंडीत ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त राजकीय वाद उफाळून येण्याच्या घटना वाढत आहेत. तीन दिवसांपूर्वी शिवसेना शाखाप्रमुखावर गोळीबारीची घटना ताजीच असताना, गावात अनधिकृत बॅनर लावल्याच्या वादातून शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चक्क निवडणूक कार्यालयात हाणामारी झाल्याची घटना भिवंडीतील भादवड येथे मंगळवारी (ता. 5) घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात हाणामारी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

भिवंडी-नाशिक महामार्गावरील निंबवली ग्रामपंचायत निवडणुकची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यातच निंबवलीतील गुळवी कुटुंबातील वाद तालुक्‍यात सर्वश्रुत आहे. येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवी व शिवसेनेचे प्रवीण गुळवी यांच्यात सरळ लढत होत आहे. या निवडणुकीत दोन्ही गट पूर्व ताकदीनिशी उतरले आहेत. त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. दरम्यान, प्रवीण गुळवी गटाच्या उमेदवारांचे बॅनर अनधिकृत लावल्याची तक्रार करण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश गुळवी भादवड येथील निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील भालेराव यांच्याकडे करण्यासाठी आले होते. त्यांच्या समक्ष दोन्ही गटात वाद होऊन उपस्थितीतांनी एकमेकांवर खुर्ची फेकून जोरदार हाणामारीला सुरुवात केली.

हाणामारीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील भालेराव यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण गुळवी, देवराम गुळवी, विनोद गुळवी, अमर गुळवी, जितेंद्र गुळवी, मंगेश तारे (सर्व रा. निंबवली) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तर प्रवीण, देवराम व विनोद गुळवी या तिघांना अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत, पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र म्हात्रे करीत आहेत.

पोलिस यंत्रणा सतर्क

भिवंडी तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकीला हिंसक रूप लागले असून, अनेक ठिकाणी हाणामारी, गोळीबारीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून आज ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी भिवंडी पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करून निवडणुकीच्या कामाचा आढावा घेतला. निवडणूक कालावधीत कायदा मोडणाऱ्या व मनाई हुकुमाचा आदेश भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विविध पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी आपल्या पथकासह विविध गावांमध्ये जाऊन गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नागरिकांचा आढावा घेऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख