मनसेला धक्का : अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला - bail application of Avinash Jadhav rejected by thane court | Politics Marathi News - Sarkarnama

मनसेला धक्का : अविनाश जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

वरच्या न्यायालयात अपील करण्याचा मनसेचा निर्णय 

ठाणे : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा जामीन सहदिवाणी न्यायाधीश एस. व्ही. इनामदार यांनी आज फेटाळला.  मनसेचे वकील राजेंद्र शिरोडकर व त्यांची टीम ठाणे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज आजच करणार असल्याचे सांगितले.

जाधव यांना न्यायालयात दाखल करताना मनसैनिकांची मोठी गर्दी झाली होती. मनसेचे अनेक नेते जाधव यांना पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात आले होते. जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.

ठाणे आणि पालघरमध्ये तब्बल 20 हून अधिक गुन्हे दाखल असल्याने विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना बागडे यांनी त्यांना हद्दपारीची नोटीस बजावली. त्यावर मनसेकडून अत्यंत परखड शब्दांत प्रतिक्रिया आली. 

कारवाईबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अत्यंत तिखट शब्दांत सरकारवर हल्ला केला. फेसबुकच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की "काल आमचा अविनाश हा नेहमीप्रमाणे लोकांचे प्रश्न घेऊन आंदोलन करीत होता. मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता हा लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असतो व लोकांसाठीच लढा देत असतो. त्याचप्रमाणे अविनाश व त्याचे सहकारी गेली अनेक महिने लोकांचे प्रश्न घेऊन आंदोलन करीत आहेत.' 

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या जाधव यांना ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते. शुक्रवारी सायंकाळीदेखील जाधव यांच्यावर नौपाडा पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे मनसे संतप्त झाली आहे 

मनसे जिल्हाध्यक्ष जाधव यांनी,काही दिवसांपूर्वीच भेट नाकारणाऱ्या वसई-विरार मनपा आयुक्ताच्या दालनात शिरून आंदोलन केले होते. या प्रकरणी त्यांच्यासह मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. या पाश्वभूमीवर,वसई-विरार उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना बागडे यांनी जाधव यांच्यावर दाखल असलेल्या 17 न्यायप्रविष्ठ आणि 3 तपास सुरू असलेल्या गुन्ह्यांची जंत्री मांडून पालघर जिल्ह्यालगतचे ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, बृहन्मुंबई व रायगड या भागासाठी हददपारीची नोटीस बजावली. 

अविनाश जाधव यांच्यावरील कारवाई अन्यायकारक असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याने आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका, असा इशारा मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख