अरुण जेटली : भाजप सरकारचे संकटमोचक!

भारतीय सत्ताकारणाचे तीन प्रमुख केंद्र म्हणजे दिल्लीतील नाॅर्थ ब्लाॅक, साऊथ ब्लाॅक आणि उद्योग भवन. या तिन्ही ठिकाणी प्रभावी वावर असणे, ही प्रत्येकाला जमणारी गोष्ट नव्हे. हे साध्य करुन दाखवलं होतं अरुण जेटली यांनी..
अरुण जेटली : भाजप सरकारचे संकटमोचक!

भारतीय सत्ताकारणाचे तीन प्रमुख केंद्र म्हणजे दिल्लीतील नाॅर्थ ब्लाॅक, साऊथ ब्लाॅक आणि उद्योग भवन. या तिन्ही ठिकाणी प्रभावी वावर असणे, ही प्रत्येकाला जमणारी गोष्ट नव्हे. हे साध्य करुन दाखवलं होतं अरुण जेटली यांनी.....'दरबारी राजकारणी' अशा कुजबुजीकडे दुर्लक्ष करत जेटली यांनी मोदी सरकारच्या पहिल्या सरकारच्या पाच वर्षांत भाजपचे 'संकटमोचक' म्हणून भूमीका बजावली. 

गेल्या वर्षी शस्त्रक्रीयेमुळे जेटली यांनी अर्थमंत्री पदाचा पदभार तात्पुरता सोडला होता. त्यावेळी पीयूष गोयल यांनी हा पदभार स्वीकारला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या नाजूक परिस्थितीमुळे मोदी यांनी जेटलींचा कार्यभार काढून घेतला, अशीही दबक्या आवाजात त्या वेळी चर्चा झाली. पण पुढच्या तीन महिन्यांत जेटली पुन्हा अर्थमंत्री म्हणून कार्यरत झाले. मोदी हे जेटली यांना पदावरुन दूर करण्यास उत्सुक नव्हते. जोपर्यंत जेटली काम करु शकत आहेत, तोपर्यंत त्यांनी अर्थमंत्रीपद सांभाळावे, अशीच मोदींची इच्छा होती. 

मोदी आणि जेटली यांच्यातले मित्रत्वाचे संबंध दोन दशकांपूर्वीपासूनचे. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या गोध्रा दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांच्यावर जगभरातून टीकेची झोड उठली होती. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरात सरकारवर कारवाई करण्याचाही विचार केला होता, असे त्यावेळी बोलले जात होते. पण जेटली यांनी लालकृष्ण अडवानी यांच्यासारख्या पक्षातल्या बड्या नेत्यांना मोदींच्या पाठीशी उभे केले, असे बोलले जाते. 

२००५ मधील सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात विरोधकांनी तत्कालीन गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात रान उठवले होते. त्यावेळीही जेटलीच त्यांच्या मदतीसाठी धावून आले होते. सोहराबुद्दीन प्रकरणात २०१० मध्ये सीबीआयने अमित शहांना अठक केली होती. जामीन मिळाल्यानंतर शहा यांना गुजरात सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. तेव्हा शहा यांनी दिल्लीत सर्वप्रथम जेटली यांचेच घर गाठले होते, असे म्हटले जाते.

राफेल करारातील कथित गैरव्यवहारांच्या आरोपांवरु मोदी सरकारवर अनेक आरोप झाले. त्यावेळी जेटली यांनी संसदेत आणि संसदेबाहेरही या आरोपांचे जोरदार खंडन केले. मोदी यांच्या गेल्या मंत्रीमंडळात राजनाथसिंह यांच्याकडे गृहमंत्रीपद होते. त्यामुळे त्यांना मोदींच्या मंत्रीमंडळातले दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हटले जायचे. पण राज्यसभेत 'लीडर आॅफ द हाऊस' असलेल्या जेटली यांनाच अनौपचारिकरित्या भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री मानले जात असे. मोदी यांचा पूर्ण विश्वास असल्यामुळेच २०१४ मध्ये अमृतसरमधून निवडणूक गमावल्यावरही जेटली यांना अर्थमंत्री करण्यात आले होते. त्यानंतर काही कालावधीसाठी ते संरक्षण मंत्रीही होते. काॅर्पोरेट अफेअर्सचेही काम त्यांनी पाहिले आहे. 

अरुण जेटली यांचा अल्पपरिचय
जेटली यांचा जन्म डिसेंबर २८, १९५२ मध्ये झाला होता. १९६०-६९ दरम्यान सेंट झेवियर्स स्कूल, नवी दिल्ली येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. १९७३ मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, कॉमर्समधून वाणिज्य विषयात पदवी संपादन केली. आणि १९७७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायदा पदवी पास केली. सत्तरच्या दशकात ते दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) विद्यार्थी कार्यकर्ते होते. १९७४ मध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले.

ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जल वाहतूकमंत्री होते. इ.स. २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. जून ३, इ.स. २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती झाली. जानेवारी १९९० मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्त केले. १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली होती. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com