Nasik education department success story | Sarkarnama

शिक्षण विभागाने गुणवत्तावाढीसाठी राबविलेल्या उपक्रमांचा चांगला परिणाम

खंडू मोरे - सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गुणवत्तावाढीसाठी राबविलेल्या उपक्रमांचा चांगला परिणाम दिसत आहे.त्यामुळे गुणवत्तेत मराठी माध्यमाचे विद्यार्थी आघाडीवर आहेत.नाशिक जिल्ह्यात तीन हजार मुले मातृभाषेच्या शिक्षणाकडे परतले आहेत.
- प्रमोद चिंचोले, शिक्षण विस्ताराधिकारी, नाशिक.

नासिक :सध्या इंग्रजी माध्यमाचे फॅड पालकांच्या डोक्‍यात चांगलेच बसले आहे.पण अनेक पालकांना आपल्या पाल्याची इंग्रजी माध्यमातील  अधोगती  लक्षात येते ,तेव्हा मुलांना मराठी शाळेमध्ये परत घालण्याशिवाय पर्याय नसतो.ह्या शैक्षणिक वर्षात राज्याभरातुन 14 हजार विद्यार्थ्यांनी  मराठी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.

यामध्ये गावोगावच्या शाळांना भेटी अन् पालकांशी संवाद यातून नाशिकचे तीन हजार मुले मातृभाषेकडे परतले.  शाळांच्या वर्ष भरातील राबविलेल्या शैक्षणिक उपक्रमांनी ह्याही वर्षी हेच चित्र रहाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

इंग्रजी माध्यमातुन मराठी माध्यमात मुलांनी प्रवेश घेतल्याचे चित्र विशेषत: ग्रामीण भागात अधिक आहे.यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने राबविलेल्या अनेक उपक्रमांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचे शैक्षणिक रूप पालटत असल्याने गावकऱ्यांनाही या शाळा आपल्या वाटू लागल्या आहेत.त्यामुळे पट वाढीबरोबरच बरोबर इंग्रजी माध्यमातून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे समाजातील सर्वच घटकांत आकर्षण आहे.आपला मुलगा इंग्रजी शिकावा,इंग्रजी बोलावा अशी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते.अनेक मुलांना इंग्रजी येत नाही आणि मराठी जमत नाही अशी स्थिती होते.तेव्हा पालक आपल्या मुलाला मराठी शाळेत घालण्याचा निर्णय घेतात.हा निर्णय घेत असताना ग्रामीण भागातील पालक जिल्हा परिषदेच्या बदलेल्या शैक्षणिक स्वरूपाला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे.त्याचा चांगला परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्यावर झाला आहे.अनेक शाळांच्या उपक्रमाची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आणि त्यातील काही उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आले. यावर्षी तंबाखूमुक्‍त,आयएसओ,शाळासिद्धी,डिजीटल,ईलर्निंग,उपक्रमशील शाळा हे उपक्रम शाळावर सुरु होते.अनेक शाळांनी ह्यात कृतीशील सह्भाग घेतला.

शालेय वातावरण प्रेरणादायी
चालू वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शालेय गणवेश,ई-लर्निंग सुविधा,रचनावादी शाळा, समाजाचा प्रत्यक्ष सहभाग,शिक्षकांचे वैयक्‍तिक मार्गदर्शन यामुळे शालेय वातावरण प्रेरणादायी ठरत आहे.त्याचाच परिणाम म्हणून ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमातील मुलं जिल्हा परिषदेच्या शाळांकडे वळू लागली आहेत.डिजिटल शाळांमध्ये ई-लर्निंगच्या माध्यमातून अध्यापन केले जाते. त्यामुळे ह्या शाळांची गुणवत्ता वाढल्याने शाळांविषयी सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख