लग्नाच्या दिवशीच अविश्वास : भाजप नेता बोहोल्यावर चढणार की उपसरपंचपद वाचवणार ! - Nasik : a bridegroom has to face no confidence motion & marriage on same day | Politics Marathi News - Sarkarnama

लग्नाच्या दिवशीच अविश्वास : भाजप नेता बोहोल्यावर चढणार की उपसरपंचपद वाचवणार !

संपत देवगिरे : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 मार्च 2018

विवाहाच्या दिवशी अविश्वास ठरावावरील सभा असल्याने विवाह की सभा अशी समस्या उभी ठाकली आहे. त्यामुळे न्यायालयात धाव घेणार आहे. - विलास जोशी, उपसरपंच कुर्णोली

अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर ग्रामपंचायत कायद्याच्या मार्गदर्शक नियमाप्रमाणे विशेष सभा घेण्यात येईल. यामध्ये फेरबदल करण्यासाठी कायद्यात तरतूद नाही. संबंधितांचे लग्न असले तरी सभा होईलच.- संजय शिंदे, निवासी नायब तहसीलदार, इगतपुरी.

नाशिक :  इगतपुरी तालुक्यातील कुर्णोलीचे भाजपचे उपसरपंच विलास जोशी यांचा 12 मार्चला विवाह आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव दिला आहे. त्यावरील मतदानाची सभाही त्याच दिवशी होत आहे. त्यामुळे जोशी यांच्यापुढे सध्या लग्नासाठी वऱ्हाडींची जमवा-जमव करावी की पद वाचविण्यासाठी सदस्यांची मने जिंकावी असे राजकीय धर्मसंकट आले आहे. पद वाचवावे की बोहोल्यावर चढावे या गोंधळाने त्यांची अक्षरशः झोप उडाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर उपसरपंच विलास जोशी यांनी आज तहसीलदारांची भेट घेऊन व्यथा मांडली. मात्र नियमानुसार विशेष बैठक त्याच दिवशी होईल. त्यात बदल नाही असे तहसीलदार अनिल पुरे यांनी स्पष्ट केले.

श्री. जोशी विरोधात सरपंच वेणूबाई तेलम, सदस्य वाळू तेलम, कुसुम गटखळ आणि संगीता जोशी अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यामुळे श्री. जोशींनी तहसीलदार पुरे, निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे यांच्याकडे कैफियत मांडली. कोणत्याही स्थितीत बैठकीचा दिवस बदलता येत नसल्याने ते पेचात पडले आहेत. त्यामुळे ते आता न्यायालयाचे दरवाजे दरवाजे ठोठावणार आहेत. त्यांचे कुटुंबिय देखील त्रस्त असुन राजकारणामुळे ओढवलेला हा प्रसंग सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यात या प्रकाराची चर्चा सुरु आहे .  प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या विषयात लक्ष घालून अविश्वास फेटाळण्याबाबत नाशिक जिह्यातील भाजप नेतेमंडळींना आदेश द्यावेत आणि शुभमंगल सुखरूप पार पाडावे अशी मागणी काही कार्यकर्ते करत आहेत . 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख