युतीच्या सरकारमध्ये शिवसेना गुलाम होती; संजय राऊतांची कबुली - sanjay raut says shivsena was slave in coalition government with bjp | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

युतीच्या सरकारमध्ये शिवसेना गुलाम होती; संजय राऊतांची कबुली

कैलास शिंदे
शनिवार, 12 जून 2021

राज्यात युतीची सत्ता असताना शिवसेना गुलाम होती. भाजपने दुय्यम दर्जा देऊन सत्तेच्या माध्यमातून  शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न केले.

जळगाव : राज्यात युतीची सत्ता असताना शिवसेना (Shivsena)  गुलाम होती. भाजपने (BJP) दुय्यम दर्जा देऊन सत्तेच्या माध्यमातून  शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न केले, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जळगाव (Jalgaon) येथे बोलताना केला. 

खासदार राऊत हे खानदेश दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी जळगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी बोलताना ते म्हणाले की, आपल्या स्वप्नातही नव्हते आपण सत्तेत येऊ, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, तीन तिघाडा होईल, असे काहीच वाटत नव्हते. कारण मीच पुन्हा येईन, अशी गर्जना चालली होती. मात्र. राजकारणात काहीही घडू शकते. राजकारण पाण्यासारखे चंचल असते. राज्यात बदल घडून शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. 

युतीच्या काळात पाच वर्षें सत्तेत असूनही आमचा कोंडमारा होत होता. आम्हाला गुलामाप्रमाणे दुय्यम दर्जा दिला जात होता. सत्तेच्या बळावर भारतीय जनता पक्ष गावागावांत शिवसेना संपविण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे मला कायम असे वाटत होते की, या राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा आणि बाळासाहेबांच्या पुण्याईने शिवसेनेचे उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री झाले. यातून शिवसेनेला काही मिळणार नाही. परंतु आम्ही महाराष्ट्रातील जनतेला सांगू शकतो की आम्ही महाराष्ट्राचे नेतृतव अगदी चांगल्या प्रकारे करू शकतो, असे राऊत यांनी सांगितले. 

हेही वाचा : झेडपी, विधानसभा, लोकसभेसाठी राऊतांचा स्वबळाचा नारा 

जळगाव जिल्ह्यातील आगामी राजकारणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यात शिवसेनेचे बळ आहे. कोणत्याही पद्धतीने निवडणुका लढण्याची मानसिकता शिवसैनिकांची आहे. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषद, विधानसभा एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणूक आम्ही आमच्या बळावर जिंकू आणि यशस्वी होऊ. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचा आमदार झाला, महापौर झाला आता खासदार शिवसेनेचा व्हावा, अशी अपेक्षा शिवसैनिकांची आहे. ती आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यापर्यंत पोचवणार आहोत.

या वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शहर प्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख