बेघर युवक बनला महाराष्ट्राच्या कॅलीफोर्नियाचा नगराध्यक्ष ! 

बेघर युवक बनला महाराष्ट्राच्या कॅलीफोर्नियाचा नगराध्यक्ष ! 

नाशिक ः राजकारण, ग्रामपालिकेचे कामकाज काहीही माहिती नव्हते. बारावीत शिक्षण घेतांना मित्रांनी प्रोत्साहन दिल्याने गंमत म्हणुन एकवीसाव्या वर्षी त्यांनी निवडणूक लढवली. जिल्हा परिषद सदस्य अन्‌ राजकारणात मुरलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे साहेबराव बर्डे यांचा पराभव करुन ते विजयी झाले. चोविसाव्या वर्षी महाराष्ट्राचा कॅलीफोर्निया अशी ख्याती असलेल्या निफाडचे नगराध्यक्ष झाले. 

नाशिक जिल्ह्यातील या सर्वात युवा नगराध्यक्षाचे नाव आहे एकनाथ तळवाडे. 

निफाड म्हणजे महाराष्ट्राचा कॅलीफोर्निया. लहान सहान पदांसाठी येथे दिग्गज नेत्यांत खडाखडी होते. मात्र या सर्वांना मात देत रहायला स्वतःचे घरही नसलेला तेवीस वर्षीय एकनाथ तळवाडे हा युवक जिल्ह्यातील सर्वात तरुण नगराध्यक्षपदी निवडून आल्याचा चमत्कार घडला. तळवाडे यांची कौटुंबीक पार्श्‍वभूमी जेमतेम म्हणावी अशी आहे. त्याचा अपवाद वगळता त्याच्या कुुटंबातील कोणीही शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. 

वडीलांचे बालपणीच निधन झाले. आई सत्यभामा आपल्या तीन मुलांसह आईकडे राहतात. मोठा भाऊ लखन मजुरी करतो. हे सर्व कुटुंब आजीला पुर्नवसन योजनेत मिळालेल्या घरकुलात राहतात. मोठ्या भावत्यानेच एकनाथला शिकवले. चौथीपर्यंत जिल्हा परिषदेच्या व त्यानंतर निफाड इंग्लीश स्कूलमध्ये बारावीपर्यंत शिकला. मित्रांच्या आग्रहातुन गंमत म्हणून 2015 मध्ये त्याने प्रभाग क्रमांक 5 मधुन उमेदवारी केली. 529 मते मिळवुन त्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य व गावातील मुरलेले नेते साहेबराव बर्डे यांचा पराभव केला. दोन वर्षांनी ध्यानी मनी नसतांना ते नगराध्यक्ष झाले. त्यामुळे ते सबंध जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेत. 

यावेळीही त्यांचा मार्ग सोपा नव्हता. शिवसेनेचे आमदार अनिल कदम गटाची सत्ता होती. त्यांनी तळवाडे यांचा अर्ज बाद करण्यासाठी सुरवातीला तहसीलदार, त्यानंतर विभागीय महसुल आयुक्त व त्यानंतर थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र कदम समर्थकांना यश आले नाही. भाजपचे राजाभाऊ शेलार आणि संदीप अभंग यांच्या सहकार्याने श्री. तळवाडे भाजपचे व सर्वात युवक नगराध्यक्ष झाले. त्याबाबत पालकमंत्री गिरीष महाजन यांनीही त्यांची पाठ थोपटली. 

Related Stories

No stories found.