एकही नगरसेवक नसलेल्या राष्ट्रवादीकडून सत्ताधारी शिवसेनेची कोंडी!
NCP Leaders from Jalgaon criticize Shiv Sena over potholes

एकही नगरसेवक नसलेल्या राष्ट्रवादीकडून सत्ताधारी शिवसेनेची कोंडी!

सत्तेत असूनही एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा या पक्षांमध्ये सुरू असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

जळगाव : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये अनेकदा विविध मुद्यांवरून मतभेद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही हेच चित्र दिसून येत आहेत. सत्तेत असूनही एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा या पक्षांमध्ये सुरू असल्याची अनेक उदाहरणे आहेत. जळगाव महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. (NCP Leaders from Jalgaon criticize Shiv Sena over potholes)

जळगाव शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचे फोटो असलेली फ्रेम पालिका आयुक्तांना देण्याचा प्रयत्न करून राष्ट्रवादी काँग्रेसने अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक नाही. 

पक्षातर्फे  महाविकास आघाडी चा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस ने पाठिंबा दिला आहे. शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्याने राष्ट्रवादी पक्षातर्फे बुधवारी अनोखे आंदोलन करून निषेध करण्यात आला. पक्षातर्फे शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांचे फोटो काढून त्याची तसबीर तयार करून ती आयुक्तांना भेट देण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

मात्र आयुक्तांनी राष्ट्रवादीची तसबीर न स्वीकारल्याने ती तसबीर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली. पक्षाचे कार्यकर्ते अशोक लाडवजारी, सुनील माळी, अमोल कोल्हे, साहिल पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्रवादीकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने शहरात त्याची चर्चा सुरू झाली आहे. 

जळगाव महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही प्रयत्न केल्याचे बोलले जाते. भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी करण्यात आलेला करेक्ट कार्यक्रम शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्रित येऊन केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण असे असूनही राष्ट्रवादीकडून मित्रपक्षालाच अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in