भाजपमध्ये वैतागलेल्या नगरसेवकांना मूळ पक्षात जाण्याचे वेध : मातब्बरांवर पक्षाची करडी नजर - many bjp corporators preparing to leave party in Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपमध्ये वैतागलेल्या नगरसेवकांना मूळ पक्षात जाण्याचे वेध : मातब्बरांवर पक्षाची करडी नजर

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

नाशिकमध्ये भाजपसाठी आगामी काळ अडचणीचा 

नाशिक : नाशिक महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत अन्य पक्षातून येउन भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले नगरसेवक पुन्हा स्वगृही परतण्याची भाषा करू लागले आहेत. संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी भाजपकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या मातब्बर नगरसेवकांवर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच पक्षापासून दुरावलेल्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची तयारी सुरु केली आहे.

भाजपने २०१७ च्या महापालका निवडणूकीत अन्य पक्षांतील निवडून येण्याची क्षमता असलेल्या नगरसेवकांना भाजपच्या तिकीटावर निवडून आणित प्रथमच मनपाची एकहाती सत्ता मिळविली. पण गेल्या चार वर्षात पक्षांतर्गत चढाओढीमुळे भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकचा भ्रमनिरास झाला. अनेकांची मने सत्ताकारणातून दुभंगली. त्यात राज्यात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अस्तित्वात आल्याने भाजप मध्ये गेलेल्या नगरसेवकांना स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा असलेले एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या भक्कम गडाला तडे जाण्यास सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच उत्तर महाराष्ट्रात, नाशिक मध्ये सत्ता अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे निर्माण झाले आहे. त्यासाठी पर्क्षातंगत डागड्डुजी करतांना पूर्वाश्रमीच्या अन्य पक्षांमधील नगरसेवकांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष गट कार्यरत करण्यात आला आहे.

सानप भाजपच्या वाटेवर?
पक्षातील नाराज नगरसेवकांवर नजर ठेवतानाच, भाजपमधून गेलेल्याना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याचे प्रयत्न सुरु असून, त्यात माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे नाव आघाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब सानप यांनी एनवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात तर पराभवानंतर शिवसेनेत प्रवेश केला. महापौर निवडणुकीवेळी सानप समर्थक बारा नगरसेवकांनी पक्षाविरोधात भुमिका घेतली होती परंतू एनवेळी माघार घेत भाजपकडून मतदान केल्याने पक्षाची अब्रू वाचली होती. परंतु आगामी निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले नगरसेवक व सानप समर्थक नगरसेवकांनी पक्ष सोडल्यास मोठ्या नुकसानीची शक्यता व त्यातून मतदारांमध्ये वेगळाचं संदेश जाण्याची भिती निर्माण झाल्याने त्यातून एकीकडे नगरसेवकांवर वॉच ठेवताना दुसरीकडे सानप यांना भाजपमध्ये प्रवेश देवून समर्थक नगरसेवकांना थोपवून धरण्याची चाल खेळली जात आहे.

महाजन जळगावातच
गेल्या दहा ते बारा वर्षांपासून नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात अधिक रस घेणारे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात नगरसेवकांसह पदाधिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील पडझड थांबविण्याचे निमित्त करून महाजन यांना पुढील काही वर्षे जळगावातचं ठेवले जाणार असल्याने नाशिकमधील शहर व जिल्ह्यातील भाजपच्या राजकारणाची सूत्रे नवीन नेतृत्वाकडे देण्याची तयारी सुरु झाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख