कर नाही त्याला डर कशाला...अनिल परबांनी चौकशीला सामोरे जावे! - bjp mla suresh bhole challenges shivsena leader anil parab | Politics Marathi News - Sarkarnama

कर नाही त्याला डर कशाला...अनिल परबांनी चौकशीला सामोरे जावे!

कैलास शिंदे
गुरुवार, 8 एप्रिल 2021

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आरोप केले आहेत. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. 
 

जळगाव : एनआयएच्या कोठडीत असलेला निलंबित सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझेने शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनीही १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप केला आहे. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनीही परब यांना आव्हान दिले आहे. कर नाही त्याला डर कशाला, अनिल परब यांनी चौकशीला सामोरे जावे, असे भोळेंनी म्हटले आहे.  

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आरोप केले आहेत. याबाबत आमदार भोळे यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहावी लागेल का?  कर नाही त्याला डर कशाला. अनिल परब यांनी चौकशीला सामोरे जावे.

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे हे जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी थेट राज्याचे मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर टीका केल्याने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत आता जळगाव जिल्ह्यातील शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील हे काय प्रतिक्रिया व्यक्त करणार याकडे लक्ष लागले आहे. आमदार सुरेश भोळे यांच्या या ट्विटनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची  चिन्हे दिसत आहेत. 

चंद्रकांत पाटील म्हणतात, त्या नेत्यांना मोक्का लावा 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह, निलंबित पोलीस अधिकारी वाझे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटित गुन्हेगारीत गुंतल्याचे दिसत आहे. या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून त्यांच्याविरुद्ध मोक्काअन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केली. 

वाझेंकडून गंभीर आरोप 
निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी थेट परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुंबई पालिकेतील ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे. तसेच, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा जबाब त्यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांना दिला आहे. मुंबई महापालिकेतील वादग्रस्त 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये गोळा करण्याचे काम परब यांनी सांगिल्याचा आरोप वाझे यांनी केला आहे.

परब यांचे प्रत्युत्तर 
अनिल परब यांनी हे आरोप फेटाळले आहेत सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र दिले आहे. सचिन वाझे कस्टडीत आहे. त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्रे बाहेर काढून सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते. प्रदीप शर्मा पण शिवसेनेचे उमेदवार होते मान्य करतो. पण वाझेंना शिवसेनेने असे काम करायला सांगितले नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर कसून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला आहे. बदनामीचा हा लेटरबॉम्ब काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील. मी पूर्णपणे कायदेशीर लढाई लढण्याच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना घाबरत नाही. मला टार्गेट करून मुख्यमंत्र्याना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तर परब यांनी दिले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख