नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रवीण दरेकरांनी दिला धीर! - bjp leader pravin darekar meets farmers in nashik district | Politics Marathi News - Sarkarnama

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रवीण दरेकरांनी दिला धीर!

संपत देवगिरे
शनिवार, 27 मार्च 2021

प्रवीण दरेकर यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर दिला.

नाशिक : शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही मायबाप सरकारचा एकही प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी फिरकला नाही. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका भाजप नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली. 

बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या काही दिवसांत बेमोसमी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील तळवाडे दिगर,पठावे दिगर, मोरकुरे, दसाणे, केरसाणे, मुल्हेर, अंतापूर आदी गावांत मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्याचा फटका बसून तालुक्यातील १२ हजारपेक्षा जास्त हेक्टर कांदा आणि भाजीपालासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात पोचले. त्यांनी अवकाळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना धीर दिला. 

यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल आहेर, लक्ष्मण सावजी,  शहर अध्यक्ष गिरीश पालवे आदी उपस्थित होते. 

दरेकर यांनी म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात बागायतदार शेतकऱ्यांच्या देखील आत्महत्या होताहेत ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. आज आत्महत्या केलेल्या खेडगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख