गिरीश महाजन म्हणतात, बंगालमध्ये मी तीन आमदार निवडून आणले! - bjp leader girish mahajan says his three candidates won in west bengal | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

गिरीश महाजन म्हणतात, बंगालमध्ये मी तीन आमदार निवडून आणले!

कैलास शिंदे
सोमवार, 3 मे 2021

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे. याचवेळी भाजपचे बंगालमधील सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले आहे. 

जळगाव : पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगलेआहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 212 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते गिरीश महाजन यांनी पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या भागातील तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत, असे जाहीर केले आहे. 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस 212 आणि भाजप 77 असे चित्र आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्ता स्थापन करणार आहेत. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.  

भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. परंतु, निकाल पाहता राज्यातील जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसत आहे. 

भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने पश्चिम बंगालमध्ये उमेदवारांच्या प्रचाराची  जबादारी दिली होती. त्यासाठी तब्बल वीस दिवस ते त्या ठिकाणी  ठाण मांडून होते. पक्षाचे नेते अमित शहा प्रचारासाठी बंगालमध्ये आले असताना ते महाजन यांना प्रचार  गाडीवर येण्याचे आवाहन करतानाच व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरुन महाजन यांच्यावर टीकाही झाली होती होती.

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला असला त्यावर महाजन यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांनी त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या भागातील तीन मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचे म्हटले आहे. यात बलूरघाट- अशोक लहरी, गंगारामपूर_- सत्येंद्रनाथ राय, तपण - बुद्धराय तुहू हे  उमेदवार विजयी झाल्याचे त्यांनी नमूद केले. 

महाजन म्हणाले की, बढणे दो हमे..मत रोको हमे, अभी तो सुरुवात है, बहोत उंचा उडना है हमे..कित्येक कार्यकर्त्यांनी रक्त सांडले, बलिदान दिले परंतु, भाजपने राष्ट्रवादी विचार सोडला नाही. या संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आम्ही ताकदीने लढलो आणि तीनवरून  75 वर पोचलो. पश्चिम बंगाल मधील भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख