जळगाव महापालिकेनंतर आता खडसे देणार महाजनांना जिल्हा परिषदेत धक्का !

जळगाव महापालिकेत सत्तांतर करून गिरीश महाजन यांना धक्का दिल्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेतही सत्तांतराची तयारी एकनाथ खडसे यांनी सुरू केली आहे.
after municipal corporation eknath khadse is now focusing on jalgaon zp
after municipal corporation eknath khadse is now focusing on jalgaon zp

जळगाव : जळगाव महापालिकेत सत्तांतर करून भाजप नेते गिरीश महाजन यांना धक्का देण्यात आला होता. आता जळगाव जिल्हा परिषदेतही सत्तांतराची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सुरू केली आहे. त्यांनी यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या गटनेत्यांशी चर्चाही केली आहे. त्यामुळे लवकरच महाजनांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.  

जळगाव जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. अजून निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे. अशा स्थितीत भाजपची सत्ता घालवण्याची तयारी सुरू झाली आहे. जळगाव येथे खडसेंच्या मुक्ताई निवासस्थानी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या गटनेत्यांशी चर्चा करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पाटील, माजी आमदार गुरुमुख जगवांनी आदी उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना रवींद्र पाटील यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेतील सत्तांतर करण्याबाबत चर्चा झाली. तसेच, जामनेर येथे जिल्हा परिषदेच्या जागेत व्यापारी संकुल उभारून झालेल्या दोनशे कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचाही चर्चा करण्यात आली.

जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्याने भाजपला व विशेषतः माजी मंत्री गिरीश महाजन यांना जबर धक्का बसला होता. शहराच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली होती. भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने हा धक्का बसला. सार्वजनिक बांधकाम मंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची खेळी यशस्वी ठरली होती. शिवसेनेने निवडीआधीच विजयाचे फलक लावले होते. मतदानात शिवसेनेला ४५ तर भाजपच्या प्रतिभा कापसेंना केवळ तीस मते पडली. एमआयएमच्या तीन जणांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले होते.

जळगाव महापालिकेत भाजपची सत्ता होती. भाजपचे तब्बल ५७ नगरसेवक तर शिवसेनेचे केवळ १५ नगरसेवक होते. अशा स्थितीत सत्ताबदल अशक्य होता. मात्र, भाजपच्या नगरसेवकांनी बंड केले आणि ते शिवसेनेला जाऊन मिळाले. या बंडाआधीच शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच, भाजपच्या बंड करणाऱ्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com