Nashik ZP politics | Sarkarnama

नयना गावितांनी अभियंत्यांना दिले शिस्तीचे धडे

संपत देवगिरे
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिवसेनेच्या शीतल सांगळे, उपाध्यक्षा काँग्रेसच्या नयना गावित, अर्थ सभापती मनिषा पवार, महिला व बाल कल्याण सभापती अपर्णा खोसकर या चौघीही उच्च शिक्षित पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आहेत. पाचव्या समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर या आदिवासी पार्श्‍वभूमीच्या आहेत. त्यामुळे सामान्यांच्या प्रश्‍नांबाबत या पाचही जणी सातत्याने अधिकाऱ्यांना नियम, कार्यपध्दती यांबाबत फैलावर घेत असतात.

नाशिक : जिल्हा परिषदेत सहा पैकी पाच सभापती महिला अन्‌ त्याही उच्चशिक्षीत. एरव्ही राजकारण्यांना थातुर मातूर उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांना आता नियम, कायद्यांबाबत जपुन रहावे लागते. पदाधिकाऱ्यांशी वरच्या पट्टीत वाद घालणाऱ्या अभियंत्याला त्याची किंमत मोजावी लागली. उपाध्यक्षा नयना गावित यांनी या अधिकाऱ्याला सभ्यतेचे धडे देत बाहेरचा रस्ता दाखविला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिवसेनेच्या शीतल सांगळे, उपाध्यक्षा काँग्रेसच्या नयना गावित, अर्थ सभापती मनिषा पवार, महिला व बाल कल्याण सभापती अपर्णा खोसकर या चौघीही उच्च शिक्षित पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आहेत. पाचव्या समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर या आदिवासी पार्श्‍वभूमीच्या आहेत. त्यामुळे सामान्यांच्या प्रश्‍नांबाबत या पाचही जणी सातत्याने अधिकाऱ्यांना नियम, कार्यपध्दती यांबाबत फैलावर घेत असतात. जिल्हा परिषदेत सुरु झालेल्या 'महिला राज' बाबत गाफील राहिलेल्या अधिकाऱ्यांना सतत 'अॅलर्ट' रहावे लागत आहे. कामचुकार व थाचुर मातुर उत्तरे देत नागीरकांची कामे न करणाऱ्यांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांची त्यासाठी सर्वदूर 'ख्याती' आहे. त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी यापूर्वीही समज दिली होती. त्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला होता.

बुधवारी कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी एका कार्यकर्त्याला असेच उध्दट उत्तरे देत 'गेट आऊट' सांगितले. कार्यकर्त्याने ही कैफीयत उपाध्यक्षा नयना गावित यांच्याकडे नेली. गावित यांनी आपल्या  दालनात वाघमारे यांना 'काम होत नसेल तरी नम्रतेने सांगा. शासनाने आपली नियुक्ती नागरीकांची कामे करण्यासाठीच केली आहे,' असे सांगितल्यावर वाघमारे यांनी त्यांच्याशीही वरच्या पट्टीत संवाद सुरु केला. तेव्हा गावित यांनी अभियंता वाघमारे यांना शिस्तीचे धडे देत समज दिली. लोकप्रतिनिधींचे अधिकार समजावून सांगत वाघमारे यांना तुमच्या बडतर्फीची शिफारस करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सगळ्यांच्या उपस्थितीतच त्यांना 'गेट आऊट' व्हायला सांगितले. त्यामुळे अधिकारी जमिनीवर येत गयावया करु लागला. मात्र गावित यांनी 'शीस्त व कामनकाजात तडजोड नाही' असे स्पष्ट करीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे ही तक्रार केली आहे. महिला पदाधिकाऱ्याच्या रणरागिणीच्या अवताराची चांगलीच चर्चा जिल्हा परिषदेत सुरु आहे.  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख