Nashik ZP CEO's order about placing work orders on website | Sarkarnama

सीईओ गितेंनी फटकारताच दिवसभरात संकेतस्थळावर अकराशे वर्क ऑर्डर!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 जानेवारी 2019

जिल्हा परिषदेचे कामकाज आणि त्यातही बांधकाम विभागाचे कामकाज म्हणजे सगळेच गौडबंगाल, ही चर्चा नवी नाही. यामध्ये पारदर्शकतेचा आग्रह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते गेले वर्षभर धरत आहेत. मात्र सुधारणा होत नव्हती. त्यामुळे दोन दिवसांपुर्वी प्रशासनाला फेलावर घेत त्यांनी तंबी देताच एकाच दिवसांत एक हजार 153 कामांच्या वर्क ऑर्डर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रकट झाल्या. त्यामुळे अनेक सदस्यांना आपल्या गटातील कामे पाहून आनंद झाला.

नाशिक : जिल्हा परिषदेचे कामकाज आणि त्यातही बांधकाम विभागाचे कामकाज म्हणजे सगळेच गौडबंगाल, ही चर्चा नवी नाही. यामध्ये पारदर्शकतेचा आग्रह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते गेले वर्षभर धरत आहेत. मात्र सुधारणा होत नव्हती. त्यामुळे दोन दिवसांपुर्वी प्रशासनाला फेलावर घेत त्यांनी तंबी देताच एकाच दिवसांत एक हजार 153 कामांच्या वर्क ऑर्डर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रकट झाल्या. त्यामुळे अनेक सदस्यांना आपल्या गटातील कामे पाहून आनंद झाला.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत विकास कामांच्या कार्यारंभ आदेश संकेतस्थळावर टाकण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते यांनी दिले होते. विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेश आदिंबाबत माहिती मिळत नसल्याबाबत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्यांनी सर्वसाधारण सभेत चर्चा केली होती. यातूनच जिल्हा परिषदेत मंजूर कामांच्या निविदा प्रक्रियेचा मुद्दा गाजत होता. त्यामुळे विकास कामांचे स्वरूप सर्वांना माहिती व्हावे, तालुक्‍यात कुठल्या गटात कुठले काम घेण्यात आलेले आहे. त्या कामांचा ठेका कोणत्या ठेकेदार देण्यात आलेला आहे. तो कधी देण्यात आलेला आहे, कामांचे कार्यारंभ आदेश केव्हा देण्यात आले. ठेकेदार याच्याशी संपर्क साधता यावा याची माहिती सदस्यांसह नागरिकांना मिळावी या हेतूने मंजूर विकास कामांच्या कार्यारंभ आदेश हे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी विभागाला दिल्या. त्यावर विभागाने कार्यवाही करत संकेतस्थळात काही बदल करत कार्यारंभ आदेश नावाने नवीन रकाना देखील तयार करण्यात आला आहे.

डॉ. गिते यांच्या आदेशानंतर विभागाकडून एकाच दिवसात संकेतस्थळावर विविध विभागामार्फेत 1 हजार 153 विकास कामांचे कार्यारंभ आदेश टाकण्यात आलेले आहे. यामध्ये इमारत व दळणवळण खात्याच्या तीन विभागांचे 720, लघुपाटबंधारे 409, ग्रामीण पाणीपुरवठा 15 आणि राष्ट्रीय आरोग्य आभियान 9 एव्हढ्या कामांचा समावेश आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख