नाशिकचा युवक देतोय, महाराष्ट्र, कर्नाटकातील 'कोरोना' फायटर्सना सुरक्षा कवच! - Nashik Young Enterpreanuer Producing Affordable PPE Kits for Corona Fighters | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकचा युवक देतोय, महाराष्ट्र, कर्नाटकातील 'कोरोना' फायटर्सना सुरक्षा कवच!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 एप्रिल 2020

'कोरोना'च्या 'कोविड 19' विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. मात्र त्या विरोधात सर्वप्रथम अस्त्र उभारले ते नाशिकनेच. सर्वप्रथम व्हेंटीलेटर, त्यानंतर मास्क, सॅनीटायझर, फेस शील्ड या विविध साधने येथील कल्पक उद्यमींची निर्मिती होती. आता या कोरोना विरोधात लढणाऱ्या डॉक्‍टर्स, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कवच देखील येथील युवा उद्योजकानेच तयार केले आ

नाशिक : 'कोरोना'च्या 'कोविड 19' विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. मात्र त्या विरोधात सर्वप्रथम अस्त्र उभारले ते नाशिकनेच. सर्वप्रथम व्हेंटीलेटर, त्यानंतर मास्क, सॅनीटायझर, फेस शील्ड या विविध साधने येथील कल्पक उद्यमींची निर्मिती होती. आता या कोरोना विरोधात लढणाऱ्या डॉक्‍टर्स, परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कवच देखील येथील युवा उद्योजकानेच तयार केले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ते कवच दिले गेले आहे.

कोरोना विरोधातील युद्धाची आघाडी संभाळणारे डॉक्‍टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सुरक्षाकवच असणाऱ्या 'पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट' अर्थात 'पीपीइ' किट्‌स सध्या नाशिकमध्ये तयार होत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन गवळी यांनी अत्यावश्‍यक सेवा म्हणून नाशिकमधील अमोल चौधरी या युवा उद्योजकाला पीपीइ किट्‌स तयार करण्याची परवानगी दिली असून येथे दररोज दोन हजार किट्‌स निर्मिती कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यसाठी केली जात आहे. याआधी अमोल चौधरी हे विविध प्रकारचे गणवेश, सैन्याला लागणारे वैशिष्टपूर्ण ड्रेस, भारतीय सैन्यदलाला लागणारे बुलेटप्रूफ जॅकेट आतापर्यंत तयार करत होते.

मात्र कोरोना आजाराच्या संकट काळात रुग्ण सेवा देणारे डॉक्‍टर्स आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना 'पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट किट्‌स' (पीपीइ किट्‌स) परिधान करणे आवश्‍यकता आहे, याबाबत सावधानता बाळगली नाही तर वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनाच या संसर्गाचा मोठा धोका संभवतो. सद्यस्थितीत राज्यासह देशात अशा किटचा मोठ्या प्रमाणात वर तुटवडा भासत आहे, एका किटची किंमत साधारण पंधराशे ते सतराशे रुपये आहे. डॉक्‍टरांना दिवसभरात किमान दोन पीपीइ किट्‌स वापरावी लागतात.

संपूर्ण भारतीय बनावटीची किट्स

अनेक डॉक्‍टर्स स्वखर्चाने हे किट्‌स खरेदी करण्यास तयार आहेत. देशात मोठ्या प्रमाणात पीपीइ कीट्‌सची आवश्‍यकता असल्याचे चित्र आहे. मात्र अमोल चौधरी या उद्योजकाने सर्व प्रकारची वाहतूक आणि मुंबई-पुण्याचा प्रवासही पूर्णपणे बंद असताना त्यांनी यासाठी लागणारा कच्चामाल सामुग्री आणि कापड शोधून काढले. कमी किमतीत संपूर्ण भारतीय बनावटीची पीपीइ किट्‌स नाशिकमधील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होत आहेत. देशातील काही राज्यांनी तसेच केंद्र सरकारने या पीपीइ किट्‌स पुरवठा संदर्भात चौकशी केल्याची माहिती उद्योजक अमोल चौधरी यांनी दिली आहे.

किट्स निर्मितीसाठी विविध प्रकारची मिळते आहे मदत

या किट्‌ससाठी त्यांना विविध स्वरुपाची मदत मिळाली. 'पीपीइ' किट्‌स तयार करताना येथील कामगारही विशेष दक्षता घेतात. चौधरी यांनी आपल्या अंबड येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये सरकारच्या नियमानुसार पीपीइ किट्‌स निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हे किट तयार करतानाही संबंधित कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय, तांत्रिक निकषांची विशेष काळजी घेतली जात आहे. या पीपीइ किट्‌स निर्मिती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी कामगारांना अत्यावश्‍यक वाहतुकीचा परवाना दिला असून अवघ्या सातशे पन्नास रुपये किमतीत पीपीइ किट्‌सची निर्मिती केली जात आहे.

दृष्टिक्षेपात 'कोरोना' सुरक्षा कवच

'कोविड 19' विषाणूपासून डॉक्‍टर्स, आरोग्य कर्मींचा बचाव,
महाराष्ट्र शासनाच्या परवानगीमुळे रोज होत आहे किट्‌स ची निर्मिती.
सद्यस्थितीत राज्यासह, देशात अशा किट्‌स चा मोठ्या प्रमाणावर तुटवडा.
पंधराशे ते सतराशे रूपयांचे पीपीइ किटची अवघ्या 750 रूपयांत निर्मिती.
लॉकडाउन च्या परिस्थितीत ही कच्चा माल शोधून निरंतरपणे सुरू आहे निर्मिती.
निर्मितीच्या तांत्रिक वैद्यकीय निकषांची घेतली जात आहे काळजी.
लॉकडाऊनच्या कालावधीत उत्पादन अखंड चालू रहावे यासाठी मान्यता.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख