धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक : पिता भाजपमध्ये, तर पुत्र काँग्रेसचे उमेदवार - what will do motilal patil in dhule-nandurbar mlc election is the question | Politics Marathi News - Sarkarnama

धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणूक : पिता भाजपमध्ये, तर पुत्र काँग्रेसचे उमेदवार

फुंदीलाल माळी
शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020

राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचेही नातेसंबंध शहादा तालुक्यात आहेत. या नातेसंबंधांच्या वापर करून काँग्रेसच्या उमेदवाराला कितपत मदत होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

तळोदा ः धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे मतदारांशी असलेले नाते व हितसंबंध चर्चेत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेनेच्या महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्ष यांची रणनीती कशी असणार, यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

भाजपकडून माजी मंत्री अमरिशभाई पटेल व काँग्रेसकडून नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील रिंगणात आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील मतदारांचे उमेदवारांसोबत असणारे नाते व हितसंबंधांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावरून विजयाच्या गणिताचा अंदाज बांधला जात आहे.

पिता भाजपमध्ये, तर पुत्र काँग्रेसचे उमेदवार
काँग्रेसचे उमेदवार अभिजित पाटील शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे पुत्र आहेत. मात्र, मोतीलाल पाटील भाजपमध्ये असून, त्यांचे पुत्र काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे मोतीलाल पाटील कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे दीपक पाटील भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे परिणाम
राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचेही नातेसंबंध शहादा तालुक्यात आहेत. या नातेसंबंधांच्या वापर करून काँग्रेसच्या उमेदवाराला कितपत मदत होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दोन्ही जिल्ह्यांतील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मतदार काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसेना या निवडणुकीत कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागून आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व विधान परिषद निवडणुकीचा गाढा अनुभव असणारे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी महाविकास आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसच्या उमेदवाराला कशी व कितपत मदत करतात, यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.

काँग्रेसचे मतदारांशी असलेले हितसंबंध
सर्वच पालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांचे भाजपचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. कारण वर्षभरापूर्वी ते कॉँग्रेसमध्येच होते. त्यामुळे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील नगरसेवकांशी त्यांचे थेट संबंध आहेत. एवढेच नव्हे, तर अनेकांना उमेदवारीसाठी त्यांनी प्रोत्साहन देऊन राजकीय वाटचालीत मदत केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे नेते व नगरसेवक कोणती भूमिका घेतात, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. पक्षीय विचारांवर शिक्कामोर्तब होण्यापेक्षा नातेसंबंध व हितसंबंधांवर कसे मतदान होते, यावर विजयाचे गणित अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख