शरद पवारांच्या उपस्थितीत खडसेंचे `सीमोल्लंघन` : हातावर घड्याळ बांधण्याची अशी झाली तयारी... - eknath khadse will join ncp in presence of Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांच्या उपस्थितीत खडसेंचे `सीमोल्लंघन` : हातावर घड्याळ बांधण्याची अशी झाली तयारी...

कैलास शिंदे
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

जळगावमधील मोठा गट खडसेंसोबत भाजप सोडण्याच्या तयारीत 

जळगाव : भाऱतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे. कोरोनामुळे मोठा कार्यक्रम न घेता मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.            

खडसे हे भारतीय जनता पक्षाला रामराम करणार हे आता निश्चित झाले आहे.' कुछ तो बडा होनेवाला है ''  अशी चर्चा आहे आता भाजपचे  कार्यकर्ते करीत आहेत. खडसे यांच्यासोबत नदेशातील भाजपचे माजी आमदार, माजी नगरसेवक असा मोठा गट जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव महापालिकेतील भाजपचे माजी पंधरा नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार आहेत.

या नगरसेवकांनी खडसे यांची मुक्ताईनगर येथे भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. या शिवाय भुसावळ, सावदा, फैजपूर, यावल येथिल विद्यमान  भाजप नगरसेवकांचा गटही त्यांच्यासोबत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्यांचा प्रवेश जळगाव येथे न होता मुंबईत होणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी (ता.१७)रोजी खडसे यांच्या समवेत चार ते पाच प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश  करतील. त्यानंतर  जळगाव येथे इतर कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

खडसे यांच्याकडून याबाबत काही अधिकृत माहिती देण्यात येत नसली तरी त्यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदार म्हणून नेमण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यांचे समर्थक माजी आमदार उदयसिंह पाडावी यांंनी महिनाभरापूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्याच वेळी खडसे यांनी त्यांना तुम्ही राष्ट्रवादीत जा, तुमच्यामागे मी येतोच, असे सांगितले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल जामनेरमध्ये आले होते. तेव्हा खडसे यांनी त्यांची भेट घेतली नाही. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी उभारलेल्या रुग्णालयाच्या कार्यक्रमात ते फिरकले नाहीत. या वेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी खडसे हे राजकारणी नेते आहेत. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानुसार खडसे `योग्य` निर्णय तर घेत तर नाहीत ना, असे आता त्यांचे समर्थक बोलत आहेत. खडसेंना मंत्री केव्हा करणार, यावर आता नंतर चर्चा होण्याची चिन्हे आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख