शिवसेनेला सत्ता पेलवेना आणि विरोधी पक्षनेतेपद सोडवेना!

शिवसेनेने जळगाव महापालिकेत भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता मिळविली, तर तांत्रिक कारणाने विरोधी पक्षनेते पद ही याच पक्षाकडे आहे.
Citizens dissatisfied with Shiv Sena in Jalgaon Municipal Corporation
Citizens dissatisfied with Shiv Sena in Jalgaon Municipal Corporation

जळगाव : शिवसेनेने जळगाव महापालिकेत भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता मिळविली, तर तांत्रिक कारणाने विरोधी पक्षनेते पद ही याच पक्षाकडे आहे. मात्र आता सत्ता पेलवेना आणि विरोधी पक्षनेते पद सोडवेना, अशी या पक्षाची स्थिती झाली आहे. जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे ५७ नगरसेवक होते. शिवसेनेचे १५ आणि एम.आय. एम. चे तीन नगरसेवक होते. (Citizens dissatisfied with Shiv Sena in Jalgaon Municipal Corporation)

अडीच वर्षानंतर शिवसेनेने आपल्या राज्यातील सत्ता बळावर  भाजपचे तब्बल ३५ नगरसेवक फोडले व पालिकेवर सत्ता मिळवत आपला महापौर बसविला. जयश्री महाजन या महापौर झाल्या तर तांत्रिक कारणाने विरोधी पक्षनेते पदही शिवसेनेकडे असून महापौरांचे पती सुनील महाजन विरोधी पक्षनेते आहेत. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेचे नेते व राज्याचे  सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केले. शिवसेनेचे संपर्कमंत्री संजय सावंत यांनी पुढाकार घेतला तर  शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही बळ लावले. 

महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री, जिल्ह्यात पालकमंत्री असलेल्या पक्षाकडे सत्ता असल्यामुळे विकासासाठी निधी उपलब्ध होवून विकास वेगाने होईल, विशेष म्हणजे शहरातील रस्त्यावरील खड्डे  बुजविले जातील, साफसफाई चांगली होइल अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरल्याचे दिसत आहे. रस्त्यावरचे खड्डे पावसाळ्याआधी बुजविले गेले तर नाहीच आता उलट ते वाढले आहेत. काही ठिकाणी मुरूम टाकून खड्डे भरण्यात आले. त्यामुळे चिखल अधिक झाला त्या मुळे वाहनधारकांची तारांबळ उडते आहे.या शिवाय सफाई होत नसल्याने डेंग्यू मलेरियाची साथ वाढली आहे.त्या मुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

शिवसेनेच्या नेत्यांनी महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणली परंतु ती चालविण्यासाठी सहकार्य केले नसल्याचे दिसत आहे. आजच्या स्थितीत निधी नाही म्हणून कामे होत नाहीत अशी म्हणण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली असल्याचे दुर्दैव आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते पदही पक्षाकडे असल्याने बोलताही येत नाही. शिवसेनेला सत्ता मिळाली परंतु तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत आहे. त्यामुळे साधी रस्ते दुरुस्ती करताही येत नसल्याने सत्ता पेलवेना आणि पक्षाकडे असलेले विरोधी पक्षनेते पद ही सोडवेना अशी स्थिती झाली आहे.

सध्या पावसाची चांगली कृपा असल्याने त्याचा नावाखाली रस्ता दुरुस्ती बंद आहे पण पाऊस थांबल्यावर मात्र जनतेपुढे सत्ताधारी रस्त्यातील खड्डे प्रश्नावरून उघडे पडतील की खड्डे बुजवून जनतेपुढे अभिमानाने जातील हे लवकरच समोर येईल. मात्र सध्यातरी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसाठी सत्ता कठीण आहे, एवढे मात्र निश्चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com