Maharashtra Assembly Deputy Speaker Narhari Zirwal Birthday | Sarkarnama

रोहयो मजूर ते विधानसभा उपाध्यक्ष; नरहरी झिरवाळ यांचा थक्क करणारा प्रवास

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 जून 2020

सर्वसमावेशक प्रगल्भ विचार सरणी आणि सर्वांना सोबत घेऊन प्रगती करण्याचा ध्यास असला की मनुष्य अनंत अडचणींवर मात करून स्वत:बरोबरच संपूर्ण समाजाचाही विकास करू शकतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ होत. ग्राम पंचायत सदस्यपदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्त या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या विविध पैलुंवर प्रकाशझोत टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न...!

दिंडोरीसारख्या आदिवासीबहुल तालुक्‍यात वनारे या अतिदुर्गम गावात जन्मलेल्या नामदार नरहरी झिरवाळ यांचा जीवनप्रवास आजच्या तरूण पिढीला निश्‍चितच प्रेरणा देणारा आहे. घरी अठराविश्‍वे दारिद्य्र असूनही शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेतून त्यांनी गावातील प्राथमिक शिक्षणानंतर वणी येथे राहून उच्च शिक्षण घेतले. मात्र, पोटापाण्याची चिंता अन्‌ मार्गातील अनंत अडथळे यामुळे काही दिवस रोजगार हमी योजनेत रोजंदारीवर काम केले. नाशिकला बांधकाम ठेकेदाराकडे बिगारी म्हणूनही काम केले तर घरी पत्नी व त्यांनी विहीर खोदत शेती ही फुलवली.

दरम्यानच्या काळात शिक्षण आणि स्वकतृत्त्वाच्या जोरावर तहासिल कार्यालयात नोकरीही केली. या काळात त्यांना प्रामुख्याने आदिवासी व शेतकरी बांधवांच्या समस्या जवळून बघावयास मिळाल्या. त्यातच, जनता दलाचे तत्कालीन खासदार हरिभाऊ महाले यांच्या जनसेवेचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला. त्यातून त्यांनी समाजाच्या हितासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा धडपड्या आणि मनमिळाऊ स्वभाव पाहून ग्रामस्थांनी त्यांना राजकारणात पहिलेच पाऊल घट्टपणे रोवण्याची संधी दिली. 

त्याद्वारे मिळालेले ग्रामपंचायत सदस्यत्व, सरपंचपद आणि येथून सुरू झालेला त्यांचा सोसायटी पंचायत समिती ,जिप असा राजकीय प्रवास थेट विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत येऊन पोहचला आहे. या प्रवासात मागे वळून पाहण्याचा प्रश्‍नच नव्हता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून आज नरहरी झिरवाळ यांच्याकडे बघितले जाते. 

कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरवत झिरवाळ यांनी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. मात्र, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्या पाठोपाठ  विधानसभा निवडणुकीतसुद्धा अवघ्या 149 मतांनी पराभव पत्करावा लागला. तरीही खचुन न जाता जनसेवेचा घेतलेला वसा कायम ठेवत त्यांनी मतदार संघात विकास कामे सुरुच ठेवली. त्याचेच फळ म्हणजे विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी मोठ्या मताधिक्यांने विजय मिळवला. 

शरद पवार हे दैवत

त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झिरवाळ यांनी मोठया मताधिक्‍याने शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा पराभव केला. या विजयासह सलग दोनवेळा निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळाला. या दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यावेळी आमदार झिरवाळ यांच्या रुपाने दिंडोरी विधानसभा मतदार संघाला प्रथमच मंत्रीपदाची संधी मिळेल, अशी चर्चा सर्वत्र होती. परंतु, प्रत्यक्षात मात्र तसे काही घडले नाही. तरीदेखील ना. झिरवाळ यांनी साधी नाराजीदेखील व्यक्त न करता, "शरद पवारसाहेब हे माझं दैवत आहेत, माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील. साहेबांनी मला पाचव्यांदा उमेदवारी दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही त्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला, त्यामुळे मी विश्‍वासघात करणार नाही' अशी भावूक प्रतिक्रिया नोंदवली होती.

अत्यंत साधे राहणीमान

अत्यंत साधं राहणीमान, स्वभावात कमालीची नम्रता व हाती घेतलेल्या कामाचा प्रचंड ध्यास असं सामान्यातलं असामान्य नेतृत्व असलेले ना. झिरवाळ यांनी यशाच्या शिखरावर असतानादेखील जमीनीशी नाळ कधी तुटू दिली नाही. सध्या विधानसभेचे उपाध्यक्ष असतानाही ते फावल्या वेळेत शेतात नांगर हाती धरतात. प्रत्येक आठवड्याचा रविवार म्हणजे साहेबांच्या घरी सकाळी 6 वाजेपासुन जनता दरबार भरलेला असतो. या दरबाराच्या माध्यमातुन मतदार संघातील लोकांच्या लहान-मोठ्या समस्यांचे सहज निराकरण होते. 

लोकांची आपुलकीने विचारपूस

तसेच, " घरी सगळे ठीक आहे ना?, मुलं काय करतात?, शेतात काय लागवड केली?, शेतमालाला भाव किती मिळाला?' असले आपुलकीचे प्रश्‍न भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला साहेब आवर्जुन विचारतात. इतकचं काय तर, साहेबांवर विशेष प्रेम असलेल्या, वणी बसस्थानकात भिक्षा मागणाऱ्या अपंग तरुणाचा मृत्यु झाल्याची वार्ता ऐन दिवाळीच्या दिवसात समजली, तेव्हा त्यांनी आहे त्या अवस्थेत वणी गाठले. तेथुन त्या तरुणाच्या मुळगावी जाऊन त्याचे अंत्यसंस्कार केले. इतकेच नव्हे तर, त्याच्या दशक्रियेचा खर्च देखील स्वत: उचलला. 

अशा प्रकारे लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वांसाठी साहेब पुर्णवेळ उपलब्ध असतात. रंजल्या-गांजल्यांच्या दु:खातच नव्हे, तर सुखात सुद्धा सोबत राहून समाज बांधवांचा आनंद द्विगुनित करण्याची साहेबांची तळमळ खऱ्या अर्थाने दिसून येते, ती जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमांवेळी. अशा कार्यक्रमांना पुर्णवेळ हजर राहुन ते समाजबांधवांची आत्मीयतेने चौकशी करतात. प्रसंगी पारंपारीक नृत्यावर ठेकादेखील धरतात. त्यामुळे ते सर्वांना हवेहवेसे तर वाटतातच, शिवाय राज्यकर्त्यांना हक्काचा कार्यकर्ता आणि सामान्य जणांना हक्काचा माणूस वाटतात.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख