Nashik Shivsena Leader Gave Garbage Garland to Officer | Sarkarnama

शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी आरोग्यधिका-यांना कच-याची माळ घातली

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

सिडको परिसरात गेल्या १५ दिवसापासून प्रभागात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, नगरसेविका हर्षाताई बडगुजर यांनी विभागीय अधिकारी  सोमनाथ वाडेकर, आरोग्य अधिकारी सुनील बुकाने व स्वच्छता अधिकारी संजय गांगुर्डे त्यांच्या अंगावर कचरा उतून निषेध नोंदविला

नाशिक  : गेल्या अनेक दिवसापासून सिडको परिसरात घंटागाडी वेळेवर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून या प्रकाराचा निषेध करत शुक्रवारी सिडको प्रभाग समिती सभेत माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी आरोग्य अधिकारी सुनील बुकाने, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या गळ्यात कचरातील् हार टाकून निषेध नोंदविला.

सिडको परिसरात गेल्या १५ दिवसापासून प्रभागात कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नसल्याने माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, नगरसेविका हर्षाताई बडगुजर यांनी विभागीय अधिकारी  सोमनाथ वाडेकर, आरोग्य अधिकारी सुनील बुकाने व स्वच्छता अधिकारी संजय गांगुर्डे त्यांच्या अंगावर कचरा उतून निषेध नोंदविला. त्या प्रसंगी सिडको प्रभाग सभापती दीपक दातीर, नगरसेविका किरण गामने दराडे, नगरसेविका रत्नमाला राणे,  कल्पना चुंबळे, शाम साबळे, डी. जी. सूर्यवंशी, नगरसेवक राकेश दोंदे, सुदाम डेमसे, छायाताई देवांग, भगवान दोंदे, भाग्यश्री ढोमसे, प्रतिभा पवार , किरण गामने, पुष्पां आव्हाड, धनाजी लगड, कल्पना पांडे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रभाग समिती सभेत कचरा फेको आंदोलनाच्या दरम्यान शिवसेना नगरसेविका किरण गामणे - दराडे यांचे पती बाळा दराडे यांनी सभागृहात प्रवेश करून सदर आंदोलनात सहभाग घेतला. तसेच कचऱ्यातील हार आरोग्य अधिकारी बुकाने यांच्या गळ्यात टाकून निषेध नोंदविला.  निषेधाच्या घोषणा देत घंटागाडी ठेकेदार हे भाजपा पदाधिकारी असून त्यांची ठेकेदारी रद्द करावी अशा घोषणा दिल्या. त्यावर भाजपा नगरसेवक राकेश दोंदे व भगवान दोंदे यांनी बाळा दराडे यांना प्रवेश दिलाच कसा ? त्यांना बाहेर काढा अशी मागणी केली. सभापती दीपक दातीर यांनी विनंती करून बाळा दराडे  यांना बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हा कुठं वाद निवळला.

शिवसेनेच्या नगरसेवकांनी कचरा फेको आंदोलन केल्याने सभागृहात अधिकारी व नगरसेवक यांच्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदर प्रकार अंगावर येत असल्याचे बघून यावेळी सभागृहात प्रथमच अंबड पोलिसांना पाचारण करण्यात आले.  परंतु नेहमीप्रमाणे वाद मिटल्यानंतर पोलिसांनी सभाग्रहात पदार्पण केले. ते बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

घंटागाडी ठेकेदारांच्या मार्फत चालवण्यापेक्षा आम्ही प्रभागाच्या वतीने चालविण्यास तयार आहोत. ठेकेदारी पद्धतीने हिशोब केल्यास दर दिवसाला एका घंटागाडी ला ६,६०० रुपये खर्च येतो तो आम्ही घंटागाडी चालविण्यात घेतल्यास दर दिवसाला २७०० खर्च येईल. अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही लवकरच मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे देणार आहोत- सुधाकर बडगुजर, माजी विरोधी पक्षनेते

बाळा दराडे यांनी सभागृहात प्रवेश करून सभागृहाचा अपमान केलेला आहे. त्यांनी अशा प्रकारे प्रवेश करून निषेधाच्या घोषणा देणे हे घटनाविरोधी आहे. त्यांच्यावर प्रशासनाने पोलिसात तक्रार करणे आवश्यक आहे - राकेश दोंदे, भाजपा नगरसेवक

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स


संबंधित लेख