Nashik Shivsena Up in Arms over Naming of Water Purification Centre | Sarkarnama

जलशुध्दीकरण केंद्र नामकरणाचा वाद शिगेला...शिवसेना म्हणते 'ठाकरे' तर भाजप म्हणते 'वाजपेयी' 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 16 डिसेंबर 2018

शहरासाठी विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. जानेवारी अखेर पर्यंत जॅकवेलचे काम पुर्ण होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी मुकणेचे पाणी शहरात आणण्याचे प्रयत्न आहेत. या जलशुध्दीकरण केद्राला कोणाचे नाव द्यायचे हा नवा वाद निर्माण झाला आहे.

नाशिक : महापालिकेच्या मुकणे धरणातून थेट पाणी पुरवठा करण्यासाठीच्या जलवाहिनीचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्याचा पाठपुरावा करण्याऐवजी महापालिकेत वेगळाच वाद रंगला आहे. विल्होळी जलशुध्दीकरण केंद्राच्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपने दिला आहे. शिवसेनेने मात्र योजनेला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, असा आग्रह करीत विरोधासाठी बाह्या वर केल्या आहेत. त्यामुळे हा वाद चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत. 

शहरासाठी विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. जानेवारी अखेर पर्यंत जॅकवेलचे काम पुर्ण होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी मुकणेचे पाणी शहरात आणण्याचे प्रयत्न आहेत. या जलशुध्दीकरण केद्राला कोणाचे नाव द्यायचे हा नवा वाद निर्माण झाला आहे. या भागातील शिवसेनेचे नगरसेवक सुदाम डेमसे यांनी कै. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी आधीच केली आहे. मात्र भाजपचे सभागृह नेते दिनकर पाटील यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावरुन योजना पुर्ण होण्याआधीच नामकरणाचा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाऐवजी आता महापालिकेतील सत्ताधारी भाजप व विरोधी शिवसेना नव्या राजकीय वादात अडकणार आहेत. 

नाशिक शहरासाठी 2007 मध्ये मुकणे धरणातून थेट पाईपलाईन योजना मंजुर केली आहे. अठरा किलोमीटर पाईपलाईन केली जाणार आहे. त्यात मुंबई महामार्गावर विल्होळी येथे जलशुध्दीकरण केंद्र केले जाईल. त्यातुन मुकणे धरणातून वार्षिक चारशे दशलक्ष घनफुट पाणी शहराला उपलब्ध होईल. त्यामुळे इंदिरा नगर, पाथर्डी, राजीव नगर, सिडकोतील काही भागातील सह लाख लोकसंख्येसाठी थेट गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचेल. त्याचे काम अद्याप सुरु आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्तावाविषयी मला माहिती नाही. माजी पंतप्रधान असल्याने अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले पाहिजे. त्यामुळे तसा प्रस्ताव दिला आहे - दिनकर पाटील, सभागृह नेता, भाजप. 

ज्या भागात जलशुध्दीकरण केंद्र आहे तेथील नागरिकांच्या मागणी नुसार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच सादर करण्यात आला आहे - सुदाम डेमसे, नगरसेवक, शिवसेना. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख