Nashik Seema Hire BJP Confident About Winning the Election | Sarkarnama

भाजप आणि विकासकामांमुळे दुस-यांदाही विजयी होईन : सीमा हिरे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

''गेल्या पाच वर्षांत झालेली विकासकामे, सिडकोच्या घरांचा सोडविलेला प्रश्‍न व कामगार वसाहतीतील पायाभूत सुविधा आणि भाजप या जोरावर नाशिक पश्‍चिम मतदारसंघातून आपला विजय निश्‍चित आहे,'' असा दावा आमदार सीमा हिरे यांनी केला आहे.

नाशिक : ''गेल्या पाच वर्षांत झालेली विकासकामे, सिडकोच्या घरांचा सोडविलेला प्रश्‍न व कामगार वसाहतीतील पायाभूत सुविधा आणि भाजप या जोरावर नाशिक पश्‍चिम मतदारसंघातून आपला विजय निश्‍चित आहे,'' असा दावा आमदार सीमा हिरे यांनी केला आहे.

मतदारसंघातील भाजपचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा मेळावा सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील हॉटेल सुरेश प्लाझा येथे झाला. या वेळी उमेदवार सीमा हिरे म्हणाल्या, '"गेल्या पाच वर्षात जी विकासकामे झाली ती लोकांपुढे आहेत. अनेक रेंगाळलेली कामे आपण मार्गी लावली आहेत. राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. त्यामुळे लोकांचा या पक्षावर विश्‍वास आहे. अशा स्थितीत विरोधक फार तग धरु शकणार नाहीत.''

''सिडकोतील घरांचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदारकीच्या कालावधीत आपण शासनाकडे पाठपुरावा करून या घरांचा प्रश्‍न सोडविला. सिडकोतील घरे फ्री होल्ड करण्याच्या मागणीला शासनाने तातडीने मंजुरी दिली. पेलिकन पार्कच्या जागेवर 17 कोटींचे उद्यान, सातपूर बसस्थानक, एमआयडीसीमधील समस्या सोडविल्याने आपला विजय निश्‍चित आहे,'' असेही त्या म्हणाल्या.

यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागूल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष गिरीश पालवे, शहर सरचिटणीस प्रशांत जाधव, बाळासाहेब पाटील, निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव आदींसह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख