Nashik Pune Bhoomipoojan By Aditya Thakre | Sarkarnama

आदित्य ठाकरेंचे पुणे रस्त्याचे भूमीपूजन ठरले देखावा! 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 19 डिसेंबर 2018

करन्सी नोट प्रेसची नेहरूनगर वसाहत, प्रतिभूती मुद्रणालयाचा गांधीनगर प्रेस व वसाहत, आर्टिलरी सेंटर, करन्सी नोट प्रेसचे नेहरूनगर येथील रुग्णालय हे महामार्गाच्या बाजूला आहे. 45 मीटर रस्ता रुंदीकरण करण्यासाठी या सरकारी आस्थापनांच्या जागा ताब्यात घेणे गरजेचे आहे. मात्र, जागा ताब्यात नसतानाच खासदार हेमंत गोडसे यांनी घाईने भूमिपूजन करून घेतले.

नाशिक : नाशिक-पुणे महामार्गाचे द्वारका ते दत्तमंदिर रस्त्याच्या मजबुतीकरणाचे भूमिपूजन शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते धडाक्‍यात झाले. प्रत्यक्षात हे काम पुढे सरकतच नसल्याने वाहतूक कोंडी आणि नागरिकांची परवड काही सपंत नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हे भूमीपूजन देखावाच ठरले आहे. 

करन्सी नोट प्रेसची नेहरूनगर वसाहत, प्रतिभूती मुद्रणालयाचा गांधीनगर प्रेस व वसाहत, आर्टिलरी सेंटर, करन्सी नोट प्रेसचे नेहरूनगर येथील रुग्णालय हे महामार्गाच्या बाजूला आहे. 45 मीटर रस्ता रुंदीकरण करण्यासाठी या सरकारी आस्थापनांच्या जागा ताब्यात घेणे गरजेचे आहे. मात्र, जागा ताब्यात नसतानाच खासदार हेमंत गोडसे यांनी घाईने भूमिपूजन करून घेतले. नेहरूनगर सरकारी वसाहतीतील रुग्णालयाची जागा देण्यास विरोध झाल्याची माहिती पुढे आली आहे. केंद्रात व राज्यात सत्तेचे भागीदार असलेल्या शिवसेना नेते आणि विकासपुरुष म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्यांना जागा देण्यासाठी असलेला विरोध शमवता आलेला नाही. 

शहराचा विस्तार वाढत असताना दिवसागणिक वाहनांची संख्या वाढते आहे. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका ते नशिक रोड यादरम्यान दिवसाला सुमारे 45 हजार वाहने ये-जा करतात. वाढत्या वाहनांचा बोजा सहन होत नसल्याने मोठ्या रस्त्यांवर अपघातांची मालिका सुरू झाली. रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणाचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानादेखील रस्ता रुंदीकरणाचा कागद सरकारी टेबलांवरून सरकला नाही. त्यामुळे लोकसभेत नाशिकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदारांनी भूमिपूजनाचा देखावा केलाय, अशी भावना स्थानिकांमध्ये तयार होऊ लागली आहे. 

खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून मोदी सरकारप्रमाणे देखावा सुरू आहे. इतक्‍या दिवसांची मागणी असूनही कोणत्याही प्रकारचे काम सुरू नाही. केवळ पोस्टरबाजी सुरू आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी जो विकास केला तो लोकांच्या समोर आहे. 
- सुषमा पगारे, नगरसेविका 

द्वारका ते दत्तमंदिरदरम्यान रस्ता रुंदीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर झाला आहे. रस्त्याचे काम लवकर सुरू होईल. 
- हेमंत गोडसे, खासदार 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख