निफाडवर भाजपने दावा केल्याने शिवसेना आमदार अनिल कदमांचे काय होणार? 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी समन्वय ठेवत भाजपच्या डॉ. भारती पवार यांना निफाडमधून मोठी आघाडी दिली. आता याच आघाडीच्या जोरावर या मतदारसंघावर भाजपचे स्थानिक कार्यकर्ते दावा सांगू लागले आहेत.
निफाडवर भाजपने दावा केल्याने शिवसेना आमदार अनिल कदमांचे काय होणार? 

निफाड : एकीकडे शिवसेना- भाजप युतीची घोषणा झाली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल कदम यांच्या निफाड मतदारसंघात एकदा नव्हे तर सलग दुसऱ्यांदा भाजपची बुथप्रमुखांची बैठक झाली. त्यामुळे निफाडमधील राजकीय नेते आणि विशेषतः शिवसेना नेते सावध झाले आहेत. यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले, "युती होवो अथवा न होवो. सर्व प्रकारची तयारी ठेवावी. निफाड मतदारसंघ भाजपला मिळावा ही भावना आपण वरिष्ठांपर्यंत पोहोचवू.'' खरोखर असे झाल्यास हॅटट्रीकच्या तयारी असलेले शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांचे काय होणार? याची चर्चा सुरु झाली आहे. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी समन्वय ठेवत भाजपच्या डॉ. भारती पवार यांना निफाडमधून मोठी आघाडी दिली. आता याच आघाडीच्या जोरावर या मतदारसंघावर भाजपचे स्थानिक कार्यकर्ते दावा सांगू लागले आहेत. रविवारी झालेल्या बुथप्रमुखांच्या बैठकीत तर विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निफाड मतदारसंघ भाजपला घ्यावा अशी थेट मागणी केली. या मतदारसंघात गतवेळी उमेदवारी केलेले वैकुंठ पाटील पुन्हा इच्छुक आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांत उठबस असलेले सुरेशबाबा पाटील यांचे ते पुतणे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची मागणी, भांडारी यांनी त्याची दखल घेणे आणि शिवसेनेचा मतदारसंघ असुनही दोन आठवड्याच्या अंतरात दुसऱ्यांदा बुथप्रमुखांचा मेळावा ही राजकीय श्रृंखला शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल कदम यांची झोप उडविणारी ठरु शकते. 

यावेळी प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले, ''भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुका शिवसेनेशी युती करून लढवणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे शिवसेनेचा जरी मतदारसंघ असला तरी आपल्याला उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे. उद्या युती होवो अगर न होवो, जे होईल त्याला आपण सामोरे जाणार आहोत. त्यासाठी आपली सर्व प्रकारची तयारी असावी, यासाठी मतदारसंघनिहाय संमेलन घेतले जात आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींनी देशात राबविलेल्या विकासयोजना लोकांपर्यंत पोचवाव्यात, असे आवाहन उपस्थिताना केले. यावेळी निफाड विधानसभा मतदारसंघ भाजपने लढवावा ही कार्यकर्त्यांची इच्छा मी वरिष्ठांपर्यंत पोचवेन.''

यावेळी खासदार डॉ. भारती पवार, सुरेशबाबा पाटील, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, शंकर वाघ, संजय वाबळे, बापू पाटील, सतीश मोरे, लक्ष्मण सावजी, लक्ष्मण निकम, नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे, राजाभाऊ शेलार, वैकुंठ पाटील, भागवत बोरस्ते, गुरूभाऊ कांदे, संजय गाजरे, प्रवीण अलई आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com