निफाडमध्ये युतीतील बिघाडी शिवसेनेच्या अनिल कदमांची हॅटट्रीक रोखणार? 

सहकारसम्राट आणि शिक्षणसम्राटांचा तसेच बागाईतदारांचा तालुका म्हणून बिरुद घेऊन मिरवणाऱ्या निफाड तालुक्‍याचा डंका महाराष्ट्रात आहे. दिवंगत माजी आमदार मालोजीराव मोगल यांच्यानंतर आमदार अनिल कदम हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत. पण सध्या भाजप सुप्तपणे राजकारणाची आखणी करीत असल्याचे चित्र आहे.
निफाडमध्ये युतीतील बिघाडी शिवसेनेच्या अनिल कदमांची हॅटट्रीक रोखणार? 

निफाड : सहकारसम्राट आणि शिक्षणसम्राटांचा तसेच बागाईतदारांचा तालुका म्हणून बिरुद घेऊन मिरवणाऱ्या निफाड तालुक्‍याचा डंका महाराष्ट्रात आहे. दिवंगत माजी आमदार मालोजीराव मोगल यांच्यानंतर आमदार अनिल कदम हॅट्ट्रिकच्या तयारीत आहेत. पण सध्या भाजप सुप्तपणे राजकारणाची आखणी करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गतवेळी विसटता विजय मिळवलेले कदम यांना विकासाचा बॅकलॉग, अँटीइनकमबन्सी 'हॅटट्रीक' रोखणार की कदम विजयश्री खेचुन आणणार, याविषयी उत्सुकता वाडली आहे. 

शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा, राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा, भाजपचे संपर्क अभियान, वंचितच्या बैठकीने निफाड तालुक्‍यात निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. भाजप-शिवसेना आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित आघाडी यांनी निफाड विधान मतदारसंघात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. एकेकाळी सहकार चळवळीमुळे कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात गेल्या दहा वर्षात राजकारणाचा पोत बदलला आहे. निफाड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 1995 पासून एक अपवाद वगळला तर या मतदारसंघावर शिवसेनेचा कब्जा आहे. गेल्या निवडणुकीत अवघ्या चार हजार मतांनी शिवसेना आमदार कदमांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी दिलीप बनकरांवर मात करत विजयश्री खेचून आणली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

सहकार उध्वस्त होत असतांना ग्रामीण अर्थव्यवस्था उध्वस्त झाली. त्यातुन प्रतिस्पर्धी कमी होत असल्याने शिवसेनेचे विद्यमान आमदार कदम यांनी त्याला हातभार कसा लावता येईल याची दक्षता घेतली. विशेषतः राज्यातील एकेकाळचा नावाजलेला निफाड सहकारी साखर कारखाना आमदार कदम यांचे सहकारी सत्तेत असतांना बंद झाला. तो अद्याप सुरु झालेला नाही. स्वतः संचालक असलेल्या जिल्हा बॅंकेचा डोलारा ढासळला. शेतकऱ्यांचे पीक कर्ज बंद झाले. मात्र हे शेतकऱ्यांचे जिवन मरणाचे प्रश्‍न निवडणुकीत महत्वाचे राहिलेले नाही हे लोकसभेच्या मतदानाच्या आकडेवारीवरुन दिसते. त्यामुळे सध्या शिवसेना- भाजप एकजुटीने, आत्मविश्‍वासाने तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस विस्कळीत व गटागटाने निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहे.

गंमत म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे सर्वाधीक सक्षम बुथयंत्रणा उभी केली आहे. मात्र त्याचा लोकसभेत काहीही प्रभाव दिसला नाही असे चित्र आहे. त्यामुळे पक्षातील अनेकांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पराभूत झालेला हवा आहे. हे विदारक चित्रामुळे ऐनवेळी उमेदवारी बदलणे, सर्वांनी एकत्र येऊन पक्षासाठी निवडणूक प्रतिष्ठेची केली अन्‌ राजकीय शहाणपणा दाखवत सत्तास्थाने वाटून घेतली तरच बदल दिसेल असे बोलले जाते. यामध्ये युती झाली नाही तर यंदा भाजप अधिक प्रभावी झालेला असल्याने कदम यांच्या मतांत यतीन कदम, भाजप हे दोघे वाटेकरी होतील. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला त्याचा फायदा मिळू शकतो. 

या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी पारंपरिक लढत अपेक्षित आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल कदम युतीचे उमेदवार असतील हे निश्‍चित आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गत निवडणुकीतील पराभूत उमेदवार, माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांसह सध्या कोणत्याच पक्षात नसलेले जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते हंसराज वडघुले हे प्रमुख आहेत. याशिवाय राजेंद्र मोगल (कॉंग्रेस), वैकुंठ पाटील (भाजप), धर्मेंद्र जाधव (बसप), उत्तम निरभवणे (वंचित बहुजन आघाडी) यांचीही नावे घेतली जातात. 
 
लोकसभा (2019) 
खासदार भारती पवार (युती) : 93,763 
धनंजय महाले (राष्ट्रवादी) : 58,019 
बापू बर्डे (वंचित आघाडी) :10,601 
जे. पी. गावित (माकप) : 3,177 
 
विधानसभा (2014) 
आमदार अनिल कदम (शिवसेना) : 78,186 
दिलीप बनकर (राष्ट्रवादी) : 74,265 
वैकुंठ पाटील (भाजप) : 18,031 
राजेंद्र मोगल (कॉंग्रेस) : 5,871 (कॉंग्रेस) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com