छगन भुजबळांपुढे युतीच्या चक्रव्युहाचे आव्हान 

राजकीयदृष्ट्या 'व्हायब्रंट' अशी ओळख नाशिकची राहिली. शहरी भागात भाजपचे, तर ग्रामीण भागातील शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. दुसरीकडे मात्र कॉंग्रेसचे संघटन खीळखीळ झालेले असताना राष्ट्रवादीचा किल्ला "आर्मस्ट्रॉंग' नेते छगन भुजबळ लढवताहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे दोन्ही कॉंग्रेसची मदार त्यांच्यावर राहणार असली, तरीही त्यांच्यापुढे भाजपचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या युतीच्या चक्रव्युहाचे कडवे आव्हान असेल.
छगन भुजबळांपुढे युतीच्या चक्रव्युहाचे आव्हान 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्र समीकरण नाशिकच्या राजकारणात राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेतही मागील विधानसभा निवडणुकीत पंधरापैकी चार जागा राष्ट्रवादीने अन्‌ दोन जागा कॉंग्रेसने जिंकल्या. मनसेचे इंजीन सुसाट धावलेल्या नाशिकमधील तीनसह चार जागा भाजपने, तर चार जागा शिवसेनेने पटकावल्या. एक जागा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने मिळवली. 

पक्षांतराची सुरवात लोकसभा निवडणुकीपासून झाली. राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करत दिंडोरीमधून खासदारकीला गवसणी घातली. त्यांनी 'शिवबंधन'मधून मुक्त होत राष्ट्रवादीत प्रवेश केलेले दिंडोरीचे माजी आमदार धनराज महालेंचा पराभव केला. डॉ. पवार यांच्याकडून भाजपच्या विशेषतः कळवण-सुरगाणा, तर  महाले यांच्याकडून राष्ट्रवादीच्या दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाबाबत अपेक्षा उंचावल्यात. 

दोन्ही कॉंग्रेसमधील 'आऊट गोईंग' सुरु होताच, भुजबळांसह इगतपुरीच्या कॉंग्रेस आमदार निर्मला गावीत आणि बागलाण राष्ट्रवादी आमदार दीपिका चव्हाण यांची नावे चर्चेत आली. तिघांनी त्याबद्दल खरमरीत शद्बात उत्तर देत चर्चेवर पडदा पाडला. दुष्काळातील होरपळ, महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी, औद्योगिक मंदी, बेरोजगारी, प्रक्रिया उद्योगांची आस, केंद्र व राज्य सरकारने नव्याने दिलेले सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम, पर्यटन विकासाचा अभाव, रखडलेला विकास हे मुद्दे राजकीय फडामध्ये अग्रस्थानी राहतील. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतले, परंतु भाजपला चमकदार कामगिरी करुन दाखवता आली नाही. भाजपमध्ये कुरबुरी वाढल्या. स्थानिक भाजप-शिवसेनेतून विस्तव जात नव्हता, पण आता शिवसेनेला 'मातोश्री'चा आदेश मानावा लागतो. 

आघाडी-युतीतर्फे आपसात दावे
आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपांबद्दल चर्चा सुरु असताना दोन्ही स्तरांवरुन बदलेल्या राजकीय परिस्थितीत जागांमध्ये आदला-बदलचे दावे ठोकण्यास सुरवात केली. कॉंग्रेसने पंधरा पैकी पाचऐवजी सात जागांवर आग्रह धरण्याची भूमिका स्पष्ट केलीयं. नांदगावच्या राष्ट्रवादीच्या जागेवर कॉंग्रेसने दावा ठोकला. या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे. शिवाय इगतपुरी, मालेगाव मध्य, नाशिक पूर्व आणि मध्य, सिन्नर या जागांसह चांदवडवर कॉंग्रेसने लक्ष केंद्रीत केले. लोकसभा निवडणुकीत युतीविरुद्ध बंडखोरी करणारे अॅड. माणिकराव कोकटे यांनी सिन्नरची राजकीय भूमिका जाहीर केली नाही. 

त्याचवेळेस शिवसेनेने नाशिक पश्‍चिम, परंपरागत नांदगावचा आग्रह ठेवत भाजपवर दबाव वाढवला. दुसरीकडे भाजपचा कळवण-सुरगाणा, नांदगाव, इगतपुरीचा आग्रह राहण्याची शक्‍यता आहे. शिवाय भाजपमध्ये बागलाण, चांदवड, नाशिक पूर्व, पश्‍चिम, मध्यमधून इच्छुकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादीमध्ये फारशी आलबेल स्थिती नाही. छगन भुजबळांसाठी आग्रह धरणारे माणिकराव शिंदे यांनी उमेदवारीची इच्छा प्रदर्शित केली. येवल्यातून शिवसेनेच्या उमेदवारीसाठी संख्या वाढली. भुजबळांचे पुत्र पंकज यांच्या विरोधात नांदगावमधून स्वकियांकडून नाराजीचा सूर आळवला. वंचित बहुजन आघाडीतर्फे नांदगाव, सिन्नर, देवळाली, नाशिक मध्य, मालेगाव मध्यमधून उमेदवारांची चाचपणी सुरु झाली. राज्यमंत्री भुसे यांच्याविरोधात उमेदवार कोण? एवढा प्रश्‍न सध्यस्थितीत उरला आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणातील हिरे घराण्यातील डॉ. अपूर्व हिरे यांनी नाशिक पश्‍चिममधून राष्ट्रवादीकडून तयारी सुरु केली असली, तरीही त्यांचे बंधू अद्वय हिरे यांनी लढण्याबद्दलचे पत्ते उघडलेले नाहीत. दिंडोरी-पेठमधून माजी आमदार रामदास चारोस्कर यांचा शिवसेनेकडे कल आहे. कळवणमधून खासदार डॉ. पवार यांचे थोरले दीर नितीन पवार आणि जाऊबाई जयश्री पवार यांची तयारी सुरु असली, तरीही त्यांचा कल अखेरच्या क्षणी महत्वाचा ठरेल. त्यांची लढत माकपचे आमदार जे. पी. गावीत यांच्याशी असेल. देवळालीतून भाजपच्या, तर नाशिक पूर्वमधून शिवसेनेच्या इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु झाली. शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांचे चुलत बंधू यतीन कदम हे निफाडमधून तयारीला लागले आहेत. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com