nashik police started decoy operation to prevent harrassment of women says vishwas nagre patil  | Sarkarnama

विश्‍वास नांगरे-पाटील : अंधेरी रातों में... नाशकात एक शहेनशाह निकलता है!

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 डिसेंबर 2019

युवती वा महिला तिच्या झालेल्या छेडखानीची तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे येत नाही. यामागे अनेक कारणे असतात. त्यामुळे लैंगिक विकृतांचे फावते. ते रोखण्यासाठी मग महिला पोलिसांनीच `सुमोटो' का करू नये, यातून डिकॉय ऑपरेशन सुरू केले. यामुळे लैंगिक विकृतांमध्ये भीती निर्माण होईल. 
- विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त, नाशिक.

नाशिक ः शहर गेले काही दिवस गाजते आहे. कारण लेकी बाळींच्या वाट्याला जाण्याची दुर्बुद्धी जरी सुचली तरी तो अवचित पोलिसांच्या जाळ्यात अडकतो आहे. 

पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या पुढाकाराने महिला पोलिसांचे निर्भया पथक स्थापन झाले आहे. ते रोज रात्री महिलांच्या साध्या वेषात स्टींग ऑपरेशन करत आहेत. अडचणीत असलेल्या महिलेने मदत मागीतली तर तिला घरी पोहोचवत आहेत. या उपक्रमाने विकृतांना आता अमिताभ बच्चनच्या सिनेमातील "अंधेरी रातो मे... सुनसान राहो पर एक शहेनशाह निकलता है' हे गाणे आठवून धडकी भरु लागली आहे.

मुली, महिलांना घरी जायला उशीर झाला, त्या बस- रिक्षाची वाट पाहत असल्यास टपोरींना ही संधीच वाटते. त्याची भिती कोणाला नाही वाटणार. रात्री कोणी छेड काढत असेल तर त्या घाबरून जाणारच. ते स्वाभाविक आहे. 

गेल्या काही दिवसांत नाशिक शहरातल्या अशा वर्दळीच्या ठिकाणी काही घटना घडल्याही. खरेदी, नोकरी-व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिला तिच्या अवतीभोवती घुटमळणाऱ्या, छेडखानी करणाऱ्या विकृतांनी हेरल्या खऱ्या. पण, त्यांचा अंदाज चुकला. त्या `निर्भया' पथकाच्या साध्या वेशातील पोलिस होत्या. छेडखानीचा प्रयत्न करताच सोबतच्या पोलिसांनी अशा विकृतांच्या मुसक्‍या आवळल्या. गेले काही महिने शाळा-कॉलेज, बगिचे किंवा इतर फिरण्याच्या ठिकाणी हे पथक असे ऑपरेशन करायचे. 

आठवडाभरापासून सार्वजनिक ठिकाणी हा कौतुकाने दखल घेण्यासारखा `रात्रीस खेळ' चालू आहे. त्याला चांगली प्रसिध्दीही मिळत आहे. यामुळे हे प्रकार कमी होतील हे नक्की. कारण यापुढे असा विचार जरी मनात आला तर त्यांच्या कानात, "अंधेरी रातो मे, सुनसान राहो पर एक मसीहा निकलता है' या गाण्याने जशी सिनेमात समाज कंटकांना धडकी भरत होती, अगदी तशीच धास्ती नाशिकमध्येही आहे.

या प्रासंगिक घटना, मात्र लैंगिक विकृतीला ठेचून काढण्यासाठीच पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून "डिकॉय ऑपरेशन' साकारले आहे. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील आणि उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांच्या नेतृत्वाखाली चार निर्भया पथकाचे कामकाज चालते. 

हैदराबादच्या घटनेमुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यातूनच शहरात महिलांच्या निर्भया पथकामार्फत "डिकॉय' ऑपरेशन सुरू केले. असे डिकॉय ऑपरेशन राबविणारे नाशिक पोलिस आयुक्तालय राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव पोलिस आयुक्तालय आहे. 

"जिची छेड काढावी, तीच महिला पोलिस' असली तर असा संदेशच वासनांधापर्यंत पोचणे हाच या "डिकॉय' ऑपरेशनचा मुख्य उद्देश आहे. जे यात सापडले त्यांच्यावर पथकाने विनयभंगाचे गुन्हेच दाखल केले आहेत.

युवती वा महिला तिच्या झालेल्या छेडखानीची तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे येत नाही. यामागे अनेक कारणे असतात. त्यामुळे लैंगिक विकृतांचे फावते. ते रोखण्यासाठी मग महिला पोलिसांनीच `सुमोटो' का करू नये, यातून डिकॉय ऑपरेशन सुरू केले. यामुळे लैंगिक विकृतांमध्ये भीती निर्माण होईल. 
- विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस आयुक्त, नाशिक.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख