Nashik Police SP Aarti Singh Takes Tough Stand on Farm Houses | Sarkarnama

...करुन गेले गुन्हेगार, पोलिसांच्या धाकाने राजकीय नेते थंडगार!

संपत देवगिरे
गुरुवार, 16 जानेवारी 2020

नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी बुधवारी नाशिक तालुका पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील हॉटेल, ढाबे, रिसॉर्ट, फार्महाऊस मालक व व्यवस्थापकांची ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात बुधवारी बैठक घेतली. बैठकीत डॉ. सिंह यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, यासाठी मार्गदर्शनपर सूचना केल्या

नाशिक : नाशिक म्हणजे धरणांचा परिसर. धरणांचा परिसर असल्याने त्याभोवती असलेल्या फार्महाऊस आलीच. सर्वच आमदार, खासदार, राज्यभरातील आजी, माजी मंत्री अन्‌ नेत्यांची फार्महाऊस येथे आहेत. मात्र, नुकतेच एका भाजप नेत्याच्या फार्महाऊसमध्ये वाडदिवसाच्या पार्टीत अत्याचाराचे प्रकरण घडले. त्यामुळे पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी सर्वच फार्महाऊस वाल्यांना तंबी दिली आहे. त्यामुळे फार्महाऊस वाल्या नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

नाशिकमध्ये शहराबाहेर मात्र सीमेवर फार्महाऊस, शेती नाही असा नेता सापडणे दुर्मिळ. सर्वच पक्षाचे नेते त्यात आहेत. किंबहुना नेता व्हायचे तर फार्महाऊस हवेच असे काहीसे समीकरण बनले आहे. गेल्या वर्षी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आपल्याकडे दिल्लीचे अनेक नेते नाशिकला फार्महाऊस बांधण्याविषयी विचारणा करतात. दिल्लीच्या मंडळींचे 'सेकड होम" म्हणून नाशिकचे नाव पुढे येत आहे असे एका जाहीर समारंभात म्हटले गेले होते. त्यातून नाशिकचे थंड हवामान, निसर्ग, पानथळी, धरणांचे बॅकवॉटर याचे आकर्षण सर्वच घटकांना किती आहे हे स्पष्ट होते. 

त्यादृष्टीने शेकडो रिसॉर्ट, फार्महाऊस, मळे निर्माण झाले आहेत. ते पार्टी, वाढदिवसाचे समारंभ, विरंगुळ्यासाठी दिले जातात. दरी-मातोरी येथील भाजप नेत्याच्या फार्महाऊस मध्ये रात्रभर वाढदिवसाचा धांगडधिंगा झाला. त्यात हवेत गोळीबार, डिजे चालकांना गंभीर मारहाण, अत्याचार व अनैसर्गिक कृत्ये घडली. या गुंडांना संरक्षण देण्याबाबत शहरातील एका महिला आमदारांचेही नाव गोवले गेले. त्यामुळे शहरभर त्याची चर्चा आहे.

या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी बुधवारी नाशिक तालुका पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील हॉटेल, ढाबे, रिसॉर्ट, फार्महाऊस मालक व व्यवस्थापकांची ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात बुधवारी बैठक घेतली. बैठकीत डॉ. सिंह यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, यासाठी मार्गदर्शनपर सूचना केल्या. खासगी व्यक्तीस फार्महाऊस दिल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशी ताकीद दिली. अप्पर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णू आव्हाड, त्र्यंबकेश्‍वर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राम कर्पे आदी उपस्थित होते. त्यामुळे राजकीय नेत्यांचे धाबे दनाणले आहे.

ज्या हॉटेल व रिसॉर्टमध्ये मद्य परवाना आहे. त्यांनी त्या ठिकाणी परवान्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही अंमली पदार्थांची विक्री व वापर करू नये. ज्यांच्याकडे कायदेशीर परवाना नाही, त्यांनी अनाधिकृत मद्यविक्री किंवा मद्यप्राशन करण्यास परवानगी देऊ नये. अॅडव्हेंचर कार्यक्रमांसंबंधी विभागाची कायदेशीर परवानगी घ्यावी. स्वीमिंग पूल असलेल्यांनी जीवरक्षकाची नेमणूक करणे बंधनकारक आहे - डॉ. आरती सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख