Nashik News Shivsena Dada Bhuse | Sarkarnama

नाशिकला शिवसेना राज्यमंत्री दादा भुसेंना हादरा

संपत देवगिरे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

जिल्ह्यातील 171 ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीत शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या. मात्र, राज्यमंत्री दादा भुसे यांच्या 'होमपीच'वर मालेगावला भाजपने त्यांना धोबीपछाड दिला. निफाड तालुक्‍यातील प्रतिष्ठेच्या पिंपळगाव बसवंत आणि चांदोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनकर गटाकडून शिवसेनेचे आमदार अनिल कदम गटाचा पराभव केला. त्यामुळे गावगाड्याच्या राजकारणातही भाजपने जोमाने प्रवेश केला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील 171 ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीत शिवसेनेला चांगल्या जागा मिळाल्या. मात्र, राज्यमंत्री दादा भुसे यांच्या 'होमपीच'वर मालेगावला भाजपने त्यांना धोबीपछाड दिला. निफाड तालुक्‍यातील प्रतिष्ठेच्या पिंपळगाव बसवंत आणि चांदोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनकर गटाकडून शिवसेनेचे आमदार अनिल कदम गटाचा पराभव केला. त्यामुळे गावगाड्याच्या राजकारणातही भाजपने जोमाने प्रवेश केला आहे.

मालेगाव तालुक्‍यातील निवडणुका भाजपचे हिरे विरुध्द शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे गटासाठी प्रतिष्ठेच्या होत्या. त्यात गेली पंधरा वर्षे सत्तेत जम बसवुन हिरेंना राजकीयदृष्ट्या विस्थापित केलेल्या दादा भुसेंना आपले संस्थान टिकवता आले नाही. तालुक्‍यातील दाभाडी आणि सौंदाणे या दोन मोठ्या ग्रामपंचायतीत शिवसेना नेते, राज्यमंत्री दादा भुसे यांना मोठा हादरा बसला. गेली पंधरा वर्षे निर्विवाद सत्तेत असलेल्या शिवसेनेला येथे भाजपच्या आमदार अद्वय हिरे यांच्याकडून पराभव चाखावा लागला. दाभाडी भाजपच्या चारुशिला निकम तर सौंदाणेत डॉ. मिलींद पवार थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाले.

पिंपळगाव बसवंत (ता. निफाड ) येथे गेली पंधरा वर्षे अबाधित सत्ता असलेले काँग्रेसचे नेते भास्करराव बनकर यांच्या पॅनेलचा पराभव झाला. भास्करराव बनकर तालुक्‍याच्या राजकारणात शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांच्या गटाचे मानले जातात. यंदा थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनकर गटाच्या अलका बनकर यांनी बास्करराव बनकर गटाच्या विद्यमान सरपंच वैशाली बनकर यांचा पराभव केला.

या निवडणुकीत दिलीप बनकर गटाला तेरा तर भास्करराव बनकर गटाला चार जागा मिळाल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये भास्करराव बनकर यांचा अल्पेश पारख या युवकाकडून पराभव झाला. तालुक्‍यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व दुसरे मोठे गाव असलेल्या चांदोरी येथे पराष्ट्रकवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे गटाच्या वैशाली चारोस्कर थेट सरपंचपदी निवडून आल्या. आमदार अनिल कदम- संदीप टर्ले गटाला सर्वाधीक जागा मिळाल्या.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात आडगाव चोथवा, कुसीर, एरंडगाव, चांदगाव, सुरेगाव रास्ता येथे शिवसेनेचे सरपंच निवडून आले. सिन्नरमध्ये भाजपचे माजी आमदार माणिकराव गटाच्या शुभांगी जाधव सरपंचपदी निवडून आल्या. तालुक्‍यातील बारा ग्रामपंचायत निवडणुकांत शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे आणि माजी आमदार माणिकराव गटाला समसमान सहा जागा मिळाल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख