भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवेंच्या पदग्रहणास खासदार, आमदारांच्या अनुपस्थितीने गटबाजीचे ग्रहण 

भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवेंच्या पदग्रहणास खासदार, आमदारांच्या अनुपस्थितीने गटबाजीचे ग्रहण 

माजी शहराध्यक्ष, आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडून नवनियुक्त अध्यक्ष गिरीश पालवे यांनी पदाची सूत्रे मंगळवारी स्वीकारली. यावेळी महासभेचे कारण देत नगरसेवक तर रक्षाबंधनाचे कारण देत आमदार प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी दांडी मारली.

नाशिक : पार्टी विथ डिफरन्सचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नियुक्तीनंतर पक्षात लगेचच गटबाजीला सुरवात झाल्याचे चित्र आहे. त्यांच्या पदग्रहणाच्या कार्यक्रमास नगरसेवक, आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी उपदेशाचे पंचामृत देत, "पंटरगिरी करुन पदे मिळत नाही. पक्षातून काढले तर तुमची किंमत शुन्य होईल.'' असा डोस कार्यकर्त्यांना दिला.  

माजी शहराध्यक्ष, आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडून नवनियुक्त अध्यक्ष गिरीश पालवे यांनी पदाची सूत्रे मंगळवारी स्वीकारली. यावेळी महासभेचे कारण देत नगरसेवक तर रक्षाबंधनाचे कारण देत आमदार प्रा. देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी दांडी मारली. गेल्या दोन महिन्यांपासून शहराध्यक्षपदासाठी अनेकांनी थेट राजधानी मुंबई, दिल्लीमध्येदेखील फिल्डिंग लावली होती; परंतु, जातीय समीकरणे जुळविण्याचा भाग म्हणून प्रदेश पातळीवरून पालवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्या पार्श्‍वभूमीवर पालवे यांच्या पदग्रहण सोहळ्यात नाराजीचे दर्शन घडले. 

महासभेचे निमित्त साधून अनेक नगरसेवकांनी पदग्रहण सोहळ्याकडे जाण्याचे टाळले. शहराच्या महापौर, उपमहापौरांनीदेखील पदग्रहण सोहळ्याची साधी विचारणादेखील केली नाही. पदग्रहण सोहळ्यात गटबाजीतून नाराजीचे दर्शन घडत असताना त्यातच प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी भाषणातून उपदेशाचे डोस पाजले. त्यांचे उपदेशाचे डोस अनेकांना धमकावणारे असल्याचे जाणवले. पक्षात बेदिली निर्माण झाल्याचे यावरून स्पष्ट झाले. 

भाजपमध्ये 'प्रोटोकॉल'नुसार नियुक्ती होत असते, मुंबई, दिल्ली गाठून नियुक्ती होत नाही. भाजप हा कोणाची राजकीय दुकानदारी चालविण्यासाठी नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे सर्वांनाच न्याय मिळतो. पंटरगिरी करून पदे मिळविता येत नसल्याचे सावजी म्हणाले. पक्षातून काढले तर अनेकांची किंमत शून्य होईल, त्यामुळे कोणी भ्रमात राहू नये, असा सल्ला विजय साने यांनी दिला. आमदार बाळासाहेब सानप यांनी पक्षकार्यासाठी कायम सहकार्य राहणार असल्याचे आश्‍वासन दिले. पदभार स्वीकारल्यानंतर पक्ष बळकट करण्याबरोबरच विधानसभा निवडणुकीत पक्षाचे मताधिक्‍य वाढविणार असल्याचे पालवे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, नाना शिलेदार, उत्तम उगले, शैलेश जुन्नरे, नगरसेवक प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com