खासदार हेमंत गोडसे जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले; चर्चा मात्र 'अंतर राखूनच'!

सध्या स्वतःला लाॅकडाऊन केलेले नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी द्राक्ष उत्पादकांच्या समस्यांबाबत चर्चा केली, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांंनी लांबूनच चर्चा करणे पसंद केले
Nashik MP Hemant Godse Met Collector for Grape Producers Problems
Nashik MP Hemant Godse Met Collector for Grape Producers Problems

नाशिक : 'कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर बहुतांश लोकप्रतिनिधी घरातच थांबले आहेत. मात्र द्राक्ष पीक काढणीच्या अवस्थेत आहे. निर्बंधांमुळे मजुर मिळत नाहीत. व्यापारी भाव पाडण्यासाठी चालढकल करतात. या तक्रारी आल्यावर 'वर्क फ्रॉम होम' मोडमध्ये असलेले खासदार हंमेत गोडसे बाहेर पडले. त्यांनी तडक जिल्हाधिकारी कार्यालय गाठून या प्रश्‍नांवर तोडगा काढण्याची विनंती केली. अर्थात ही चर्चा झाली ती जिल्हाधिकारी आणि खासदार यांच्यात चक्क दोन मीटर अंतरावरुन.

गेले आठवडाभर 'कोरोना'चे निर्बंध आल्यावर द्राक्ष काढणीसाठी मजुर मिळत नाही. हे मजूर टोळीने असल्याने पोलिस त्यांना जागोजागी अडवतात. शिवाय जमावाला बंदी आहे. त्यामुळे यातून मार्ग कसा काढायचा ही मोठी समस्या आहे. वाहतूक व बाजारपेठेतील अडचणीचे कारण देत बहुतांश व्यापारी देखील सौदा झालेली द्राक्ष घेण्यास चालढकल करीत आहेत. दिवसातून तीन तीन वेळा भाव पडतो आहे. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याशी संपर्क केला. अडचणींचे गांभीर्य लक्षात घेऊन सध्या 'वर्क फ्रॉम होम' मोड मध्ये असलेले गोडसे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. त्यांनी या विषयावर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. अर्थात ही चर्चा झाली ती आधी सॅनिटायझेशन करुन अन्‌ दोन मीटरचे अंतर ठेऊनच.

बुधवारी सायंकाळी पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र हे वातावरण करोना विषाणू, अन्य आजारांना पोषक असल्यामुळे प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. करोना विषाणूंमुळे द्राक्ष बागायतदाराची चिंता आणखी वाढली आहे. लाखोंचा खर्च करून घेतलेले द्राक्ष पिक काढून तयार आहे. मात्र संचारबंदी मुळे द्राक्ष परराज्यातच नव्हे तर स्थानिक बाजारपेठेत देखील पाठवणे अवघड झाले आहे. त्यामुळे तोदेखील मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. शासनाने याचा विचार करून द्राक्ष बाजारपेठेत पाठवण्यासाठी वाहतूक संस्थांना परवानगी द्यावी अशी मागणी चेहेडी येथील शेतकरी सुनील बोराडे यांनी व अन्य बागायतदारांनी केली आहे आहे. 

सध्या काही ठिकाणी द्राक्षे काढून व पॅकिंग करून तयार आहेत तर काही ठिकाणी द्राक्ष बाग अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा पावसाळा चांगला झाल्यामुळे भाजीपाला पीक समाधान कारक आले आहे. मात्र करोनामुळे संचारबंदी असल्याने भाजीपाला व फळ भाज्या तसेच सफरचंद, चिकू व अन्य फळे बाजारपेठेत नेण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने योग्य निर्णय घेऊन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून शेतकरी बांधवांनी योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com