दोन्ही कुटुंबाचा लोकसेवेचा वारसा अन्‌ पतीच्या प्रोत्साहनातून ठेवले राजकारणात पहिले पाऊल : आमदार सीमा हिरे

माझे बाबा, आई कादवा साखर कारखान्यात संचालक असल्याने राजकारण नवीन नव्हते. विवाह झाल्यावर सासरे भाजपचे नेते असल्याने तिथेही सतत कार्यकर्त्यांचा वावर. या वातावरणातच पती महेश यांच्या प्रोत्साहन दिल्याने मी 2002 मध्ये नगरसेविका झाले. राजकारण अन्‌ लोकसेवेतील ते माझे पहिले पाऊल होते. भाजपच्या आमदार सीमा महेश हिरे आपल्या राजकारणातील प्रवास उलगडुन सांगत होत्या...
दोन्ही कुटुंबाचा लोकसेवेचा वारसा अन्‌ पतीच्या प्रोत्साहनातून ठेवले राजकारणात पहिले पाऊल : आमदार सीमा हिरे

सामान्य मुलींसारखेच माझे बालपण गेले. इतरांसारखेच शाळा, कॉलेजचे शिक्षण अन्‌ लग्न झाले. आमदार तर दूर, नगरसेवक होईन, असेही मला कधी वाटले नव्हते. निवडणुक लढवेन असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र, सगळ्यांच्या प्रोत्साहनातुन आजचा टप्पा गाठला. त्यात सगळ्यांचे सहकार्य, प्रेम आहेच. मात्र, आजही राजकारण सत्तेसाठी नव्हे तर सामान्यांच्या मदतीला धावून जाणे अन्‌ समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचे साधन असे मी मानते. हाच संस्कार मी सतत जपला. निःसंशय माझ्या यशाचे गमकही तेच आहे.

माझे बाबा प्राचार्य यशवंतराव पाटील दिंडोरी (जि. नाशिक) चे आहेत. नाशिकला त्यांनी यशवंत क्‍लासेस सुरु केले. मात्र गावाशी संपर्क कायम ठेवला. त्यातुनच ते दोनदा कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणुन निवडून आले. त्यानंतर माझी आई सुमती पाटील संचालक झाली. या काळातच राजकारणाशी किंचित संपर्क आला. मात्र, सासरे पोपटराव हिरे भाजपचे प्रदेश चिटणीस होते. त्यामुळे घरी कार्यकर्त्यांचा सतत राबता असे. लग्नानंतर 1992 मध्ये मोठे दीर मिलींद हिरे यांनी महापालिकेची पहिली निवडणूक लढवली. तेव्हा सात मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यानिमित्ताने प्रचारासाठी घरोघरी गेले. 1997 मध्ये देखील पुन्हा प्रचार केला.

महापालिकेच्या निवडणुकीत 2002 मध्ये पती महेश हिरे यांच्या गंगापूर रोड भागातील बांधकाम व्यवसायाच्या निमित्ताने त्या वॉर्डाचा चांगला अभ्यास केला. महिलांसाठी आरक्षण असल्याने तीन सदस्यांच्या प्रभाग होता. त्यात भाजपची नगरसेवक म्हणुन मी विजयी झाले. आमच्या पॅनेल मधील अनिल भालेराव आणि संतोष गायकवाड पराभूत झाले. त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत प्रकाश मते आणि अरुण काळे विजयी झाले होते. आमचे दोन उमेदवार मात्र पराभुत झाले त्याची खंत वाटली. ती माझी पहिली निवडणुक. लग्नाला बारा वर्षे झाली होते. मुलगी रश्‍मी सहा तर रुचा तीन वर्षाची तर मुलगा राज अवघा एक वर्षाचा होता. अशा अडचणीच्या काळात निवडणुकीला उभे राहण्याची माझी अजिबात तयारी नव्हती.

मात्र, पती महेश यांनी त्या प्रभागाचा खुपच बारीकसारीक अभ्यास केला होता. नातेगोती, परिचीत, संपर्कातील कार्यकर्ते हे त्यांनी तपशीलवार घरी मांडले. त्यांचे प्रोत्साहन व सबंध कुटुबांच्या पाठिंब्याने निवडणुकीत उतरले व यशस्वी झाले. महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत प्रभागासाठी केलेली विकासकामे, लोकसंपर्क आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर मी मतदारांना सामोरे गेले. यावेळी दोन सदस्यांचा प्रभाग होता. त्यात मी आणि आमदार राहुल आहेर असे दोघेही यशस्वी झालो. यावेळी सर्वाधिक मते मिळालेली नगरसेविका ठरले. याच कामाच्या जोरावर 2014 मध्ये नाशिक पश्‍चिम मतदारसंघातुन भाजपने मला उमेदवारी दिली व आमदार झाले.

पक्षाचा विस्तार, कौटुंबिक पाठींबा आणि कार्यकर्ते, नेत्यांचे समर्थन यातुन मी आजवरचा पल्ला गाठू शकले. राजकारण हे सामाजिक परिवर्तन व लोकांच्या अडचणीत धावुन जाऊन त्यांना बळ देणे यासाठीचे माध्यम आहे. या सबंध प्रवासात ही शिकवण मी मनात घट्ट ठेवली आहे. त्यानेच मला काम करण्याचे बळ मिळते.

Seema Hire

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com