आमदार दिलीप बनकरांची शेतकऱ्यांसाठी राज्यातील पहिली किसान थाळी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी एक पाऊल पुढे टाकत पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सरकारी अनुदानाविना दहा रुपयांत 'किसान थाळी' सुरु केली. विशेष म्हणजे शिवथाळीपेक्षा एक पोळी, ठेचा अन्‌ सोबत कांदाही दिलाय. थाळींच्या संख्येला मर्यादा नाही
NCP Mla Dilip Bankar Starts Cheap Meal For Farmers
NCP Mla Dilip Bankar Starts Cheap Meal For Farmers

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीने जिल्ह्याच्या मुख्यालयी दहा रुपयांत शिवभोजन सुरु केले. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी एक पाऊल पुढे टाकत पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सरकारी अनुदानाविना दहा रुपयांत 'किसान थाळी' सुरु केली. विशेष म्हणजे शिवथाळीपेक्षा एक पोळी, ठेचा अन्‌ सोबत कांदाही दिलाय. थाळींच्या संख्येला मर्यादा नाही, जेव्हढे शेतकरी, कामकरी येतील सगळ्यांना जेवण, या भुमिकेने राज्यातील हा पहिला व सरकारच्याही एक पाऊल पुढे असलेला उपक्रम आहे.

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना पिंपळगाव बसवंत बाजार समितीत शेतीमाल विक्रीसाठी आल्यानंतर जेवणाचे दोन घास पुरवणारे असावेत, या उद्देशाने पिंपळगाव बाजार समितीने तनिष्का महिला बचत गटाच्या सहकार्याने बुधवारी कार्यान्वित केली. शेतकऱ्यांसाठी अवघ्या दहा रुपयांत तीन चपात्या, भाजी, डाळ, भात, कांदा, चटणीचे भोजन देणारी पिंपळगाव बाजार समिती ही राज्यात प्रेरक संस्था ठरली आहे. आमदार, सभापती दिलीप बनकर यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाच्या शिवथाळी योजनेच्या धर्तीवर बाजार समितीत किसान थाळीचा उपक्रम सुरू केला.

या समितीत कांदा, टोमॅटोसह शेतीमाल विक्रीसाठी नाशिकसह परजिल्ह्यातून शेतकरी येतात. शेतीमाल विक्रीसाठी आल्यानंतर हॉटेलमधील जेवण त्यांच्या खिशाला परवडणारे नसते. पंधरा दिवसांपूर्वी राज्य शासनाने गरिबांसाठी दहा रुपयांत शिवथाळी योजनेचा आरंभ केला. तीच संकल्पना पिंपळगाव बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी राबविण्याचा निर्णय सभापती बनकर यांनी घेतला. शेतकऱ्यांना पोटभर जेवण देण्याबरोबरच पिंपळगावच्या तनिष्का महिला गटाला रोजगार उपलब्ध करून देण्याचा विधायक निर्णय बाजार समितीने घेतला. एका थाळीसाठी शेतकऱ्याकडून दहा रुपये, तर बाजार समिती 25 रुपये अनुदान 'तनिष्का' महिला बचत गटाला देणार आहे. शासनाच्या थाळीत रोज दीडशेची मर्यादा आहे. येथे मात्र मर्यादा नाही. येईल त्याला जेवण दिले जाईल. गोंधळ होऊ नये यासाठी सीसीटीव्ही बसविले आहे. बचत गटाला जागा, अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

त्याचे उद्‌घाटन आमदार बनकर यांनी केले. यावेळी अशोक शाह, तानाजी बनकर, जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, सोहनलाल भंडारी, प्रतापराव मोरे, उपसभापती दीपक बोरस्ते, संचालक रामभाऊ माळोदे, सुरेश खोडे, निवृत्ती धनवटे आदी उफस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करुन थाळी सुरु करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार आम्ही बाजार समितीच्या पुढाकाराने ही थाळी सुरु केली. पहिल्या दिवशी 411 जणांनी भोजन घेतले. राज्यातील इतरांनाही त्याचे अनुकरण करावे असे वाटत - आमदार दिलीप बनकर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com