Nashik Mla Dilip Bankar And Rambhau Malode Long Friendship | Sarkarnama

आमदार दिलीप बनकरांचा अदृष्य मित्र अन्‌ 'मिस्टर इंडिया' रामभाऊ माळोदे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 मार्च 2020

निफाडच्या राजकारणातील कृष्ण व सुदामा यांच्या मैत्रीतील हळुवार नातं जपणारी ही मैत्री. आपला थाटमाट सोडुन सुखदुःखात सहभागी होऊन मैत्रीला जागणारी जोडी म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप बनकर आणि रामभाऊ माळोदे माळो

नाशिक : मिरवणे, कौतुक, सत्कार याचे दुसरे नाव राजकारण. मात्र निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या प्रत्येक निवडणुकीत सावलीसारखा त्यांची साथ देणारी, निवडणूकीचा गड लढवणारी पण कधीही जाहीर समारंभ, गर्दीत त्यांच्यासमवेत न दिसणारी व्यक्ती म्हणजे रामभाऊ माळोदे. ही मैत्री गेली 27 वर्षे कायम आहे. 

थोडक्‍यात काय तर आमदार बनकरांसाठी रामभाऊ माळोदे म्हणजे कधीच नजरेस न पडणारा, सदैव साथसंगत करणारा मात्र कधीच नजरेस न पडणारा मिस्टर इंडियाच!

आमदार दिलीप बनकर यांची ग्रामपंचायतीपासून तर विधानसभा, बाजार समिती असो वा कोणतीही निवडणूक, दौरा, कार्यक्रम यामध्ये नियोजन, पडद्यामागे राहून सारी सुत्रे हलवणारे रामभाऊ माळोदे. 1993 मध्ये त्यांचा परिचय झाला. त्यानंतर 1997 मध्ये पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात वॉर्ड 1 मध्ये दिलीप बनकरांसाठी भाऊबंदकी विरोधात राजकारणातील पहिली एंट्री होती. श्री. माळोदेंचे नियोजन व बनकरांचे परिश्रम यात भास्करराव बनकर यांची तीस वर्षांची राजकीय सत्ता खालसा करुन ते विजयी झाले. तेव्हापासून ही मैत्री सुरु आहे. 

निफाडच्या राजकारणातील कृष्ण व सुदामा यांच्या मैत्रीतील हळुवार नातं जपणारी ही मैत्री. आपला थाटमाट सोडुन सुखदुःखात सहभागी होऊन मैत्रीला जागणारी जोडी म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप बनकर आणि रामभाऊ माळोदे माळोदे.

सत्तावीस वर्षापुर्वी आमदार दिलीप बनकर हे नाव निफाडच्या मुसद्दी राजकीय पटलावर नव्हते. तेव्हा ते ट्रान्सपोर्ट व्यवसाय सांभाळायचे. शेखर भोसले यांच्या माध्यमातुन बनकर यांची रामभाऊ माळोदे यांच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर लगेचच मैत्रीत झाले. पुढे ही मैत्री अधिकच घट्ट झाली. 1997 मध्ये बनकर यांनी पिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातुन राजकारणाचा श्रीगणेशा केला. तेव्हापासुन माळोदे यांनी त्यांना खंबीर साथ दिली. 

बनकर यांच्या राजकीय कारर्कीर्दीचे सर्वाधीक जवळचे साक्षीदार म्हणुन माळोदे हे आहेत.

 पाणावलेल्या डोळ्यांनी माळोदे हे आमदार बनकर यांच्या आयुष्यात चढउताराचे प्रसंग सांगतात. सन 1999 विधानसभा निवडणुकीत अपयशानंतर झपाटल्या सारखा बनकर यांनी मतदारसंघ पिंजून काढला. त्यानंतर ते 2004 मध्ये ते 49 हजार मताधिक्‍यांनी विजयी होऊन आमदार झाले. या निवडणुकीचे अतिशय चांगले व सर्वच नियोजन, जमवाजमव करण्यात पडद्यामागे होते रामभाऊ माळोदे. या निकालानंतर बनकर यांनी मारलेली घट्ट मिठी आजही स्मरणात आहे, असे माळोदे सागंतात.

श्री. माळोदे शेतकरी आहेत तसेच ते व्यवसायात देखील आहेत. त्यांची 'विवेकशील ऍग्रो सेल्स प्रायव्हेट लिमीटेड' ही कंपनी आहे. या शिवाय शेतीला लागणारी रासायणीक व बायो फर्टीलायझरचे ते वितरक आहेत. यामध्यमातून ते जेव्हा परदेशी जातात तेव्हा दिलीप बनकर त्यांच्या सोबत असतात. दक्षिण कोरीया, हॉंग कॉंग, चीन, मलेशीया अशा विविध देशांना या दोघांनी भेटी दिल्यात. आहेरगाव विविध कार्यकारी सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत. एकवेळ विधानसभा, लोकसभा निवडणूक सोपी मात्र ग्रामपंचायत फार कटकटीची असते. गेली सत्तावीस तेवीस वर्षे आमदार बनकरांची ही निवडणूक श्री. माळोदे सांभाळतात. 

आमदार बनकर गोल गोल शब्द न वापरता ते थेट खरे ते सांगतात. त्याने लोक नाराज होतात. त्यामुळे फटकळ स्वभावाने त्यांना राजकारणातही अडचण होते. मात्र या स्वभावासह माळोदे व बनकर यांची मैत्री कायम आहे. प्रत्येक निवडणुकीत ते सक्रीय असतात, नियोजन करतात, कार्यकर्ते सांभाळतात, मात्र कुठेही व्यासपीठावर कौतुका, स्तुती किंवा हारतुरे स्विकारायला जात नाहीत. ते श्री. माळोदे यांच्या स्वभावातच नाही. त्यामुळे बनकरांचे अदृष्य सहकारी अर्थात 'मिस्टर इंडिया' असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख