आमदार देवयानी फरांदे यांनी पाठलाग करुन एटीएम चोराला पकडले

भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे शनिवारी सायंकाळी शहरातील इंदिरानगर परिसरात कार्यक्रमासाठी जात होत्या. यावेळी रस्त्यावरील युनियन बॅंकेच्या एटीएम मध्ये दोन इसम संशयास्पद वाटले. त्यामुळे आमदार फरांदे यांनी गाडी थांबवताच त्यातील संशयीत पळू लागला. त्यानंतर आपला चालक व अंगरक्षकाच्या मदतीने त्यांनी त्याचा पाठलाग करुन पकडले.
आमदार देवयानी फरांदे यांनी पाठलाग करुन एटीएम चोराला पकडले

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे शनिवारी सायंकाळी शहरातील इंदिरानगर परिसरात कार्यक्रमासाठी जात होत्या. यावेळी रस्त्यावरील युनियन बॅंकेच्या एटीएम मध्ये दोन इसम संशयास्पद वाटले. त्यामुळे आमदार फरांदे यांनी गाडी थांबवताच त्यातील संशयीत पळू लागला. त्यानंतर आपला चालक व अंगरक्षकाच्या मदतीने त्यांनी त्याचा पाठलाग करुन पकडले. संशयीत हरियानातील सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. प्रसंगावधान राखून महिला आमदाराने पाठलाग करीत सराईत चोराला पकडल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. 

याबाबतची घटना अशी की, शाबीर रज्जू खान आणि अखलाख अब्दुल खान (रा. हरियाना) सायंकाळी एटीएममध्ये शिरले. एकाने एटीएमच्या मागच्या बाजूस असणारी केबल ओढताना बॅंकेचे अधिकारी मुकेश कासार यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले. त्यांना याबाबत शंका आल्याने बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी बाहेर येत या दोघांना पकडले. त्याच दरम्यान एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याला आमदार फरांदे यांनी पकडले. एटीएममध्ये कार्ड टाकायचे, वायरिंगची छेडछाड करायची, पैसे तर घ्यायचे. मात्र पुन्हा बॅंकेत जाऊन आपले पैसे मिळाले नाहीत, अशी रीतसर तक्रार करून पुन्हा बॅंकेकडून पैसे घ्यायचे. असा प्रकार संशयित करत असल्याचे समोर आले.

त्यांचा एक साथीदार चारचाकी घेऊन फरारी झाला. यावेळी एटीएम वर दरोडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र पाठलाग करुन पकडले गेल्याने तो प्रयत्न फसला. या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर चौकशीत 'एटीएम'मध्ये फेरफार करून चोरी करणारा हरियाना येथील गुन्हेगार निघाला. 

यासंदर्भात आमदार फरांदे यांनी सांगितले, की रथचक्र चौकातील अजय मित्रमंडळाच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानासाठी त्या जात होत्या. चार्वाक चौकात आल्यानंतर त्यांना युनियन बॅंकेच्या एटीएमजवळ गोंधळ होत असल्याचे दिसले. त्यातच संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या दोघांपैकी एकाने धावण्यास सुरवात केली. आमदार फरांदे यांना शंका आल्याने त्यांनी चालक सागर यास त्यांच्या मागे गाडी घेण्यास सांगितले. जिल्हा परिषद कॉलनी, दत्त मंदिर परिसर, अभिनव बालमंदिर शाळा भागातील गल्ल्यांमधून फिरत अखेर एका कोपऱ्यात त्यांनी त्यांचा अंगरक्षक संतोष पाटील यांच्या मदतीने संशयिताला पकडले.

आपल्याच गाडीत बसवून पुन्हा युनियन बॅंकेची शाखा गाठली. या काळात गस्तीवरचे पोलिसही तेथे पोचले होते. तेथे असलेल्या दुसऱ्याला आणि बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी पकडून ठेवलेल्याला ताब्यात घेण्यात आले. आमदार फरांदे स्वतःच्या गाडीतील संशयितदेखील पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. तेथे पोचलेल्या नागरिकांनी याबाबतची माहिती उपस्थितांना दिल्यानंतर टाळ्यांच्या गजरात आमदार फरांदे यांचे कौतुक करण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com