नाशिकात भाजपला फुटला घाम; सात नगरसेवक नॉट रिचेबल ! 

 नाशिकात भाजपला फुटला घाम; सात नगरसेवक नॉट रिचेबल ! 

नाशिक ः महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपचे नगरसेवक आज मुंबईला माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे गेले तेथून ते सहलीला रवाना झाले. सायंकाळपर्यंत यातील सात नगरसेवक "नॉट रिचेबल' होते. नगरसेवकांचा थांगपत्ता लागत नसल्याने स्थानिक नेते व आमदार चिंतेत आहेत. हे सगळे नेते नगरसेवकांच्या शोधासाठी धावाधाव करीत आहेत. 

महापौर निवडणुक येत्या 22 नोव्हेंबरला होत आहे. नाशिक महापालिकेत 122 पैकी भाजपचे 66 सदस्य आहेत. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीतील बदललेल्या राजकीय संदर्भामुळे महापालिकेतही भाजपची अग्नीपरिक्षा होईल अशी धाकधुक आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वांना एकत्र करुन बाहेरगावी "कॅम्प' करण्याच्या सुचना दिल्या होत्या. 

त्यात शहरातील सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहूल ढिकले या तिन्ही आमदारांना आपआपल्या मतदारसंघातील आमदारांना एकत्र करुन तीन बसेसद्वारे मुंबईला यावे अशा सुचना होत्या. त्यासाठी काल रात्रीच निरोप दिले होते. सकाळी अकराला हे सर्व रवाना होणार होते. मात्र यातील दहा ते पंधरा नगरसेवकांचा संपर्कच होत नव्हता.

त्यानंतर यंत्रणा हलली. मात्र सायंकाळी चार पर्यंत सात नगरसेवक नॉट रिचेबल होते. प्रत्यक्षात ही संख्या अधिक असल्याचे बोलले जाते. सात नगरसेवक संपर्कात नाहीत याला पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल यांनी दुजोरा दिला. मात्र लवकरच हे नगरसेवक आम्हाला जॉईन होतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यामध्ये सिडको परिसरातील राकेश दोंदे, भगवान दोंदे, पल्लवी पाटील यांचा समावेश असल्याचे बोलले जाते. 

भाजपकडे महापौरपदासाठी संगीता गायकवाड, माजी सभागृहनेते दिनकर पाटील, दिनकर आढाव, स्थायी समितीचे माजी सभापती उध्दव निमसे, हिमगौरी आडके, सतीश कुलकर्णी, मुकेश शहाणे, अरुण पवार इच्छुक आहेत. हे सर्व उमेदवारीसाठी राजकीय डावपेचात व्यस्त आहेत. यातील प्रत्येक जन माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. 

दुसरीकडे ज्याचे नाव निश्‍चित होईल त्याच्या नाराजीने नगरसेवकांत आणखी गळतीची भिती आहे. त्यामुळे आज सायंकाळी मुंबईत गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बैठक होऊन इच्छुकांबाबत चर्चा होईल. या पार्श्‍वभूमीवर कोणत्याही इच्छुकाने सुचना दिल्याशिवाय उमेदवारी अर्ज भरु नये असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बजावले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सत्तांतराचे वारे नाशिक महापालिकेतही पोहोचु नेय यासाठी भाजप नेते कडेकोट तयारी करीत आहेत. 

"सर्व नगरसेवक एकत्रच आहोत. भाजपमध्ये काहीही तोडफोड होणार नाही. विरोधकांकडून अशा अफवा पसरवल्या जात आहेत. सात नगरसेवकांचा संपर्क होत नाही. मात्र ते लवकरच आमच्यात सहभागी झालेले दिसतील.'

- सुनील बागूल, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com