फडणवीसांच्या स्वप्नपूर्तीसाठी भाजप महापौर छगन भुजबळांच्या दारी!

शहर बससेवेसाठी होणारा वार्षिक तोटा भरून काढण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. पालकमंत्री भुजबळ यांच्या निवासस्थानी सोमवारी महापौर कुलकर्णी यांच्यासह सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील यांनी भेट घेतली
Nashik Corporation Office Bearers Meet Chagan Bhujbal
Nashik Corporation Office Bearers Meet Chagan Bhujbal

नाशिक : देवेंद्र फडणवीसांनी नाशिकसाठी टायरबेस मेट्रोची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिककरांना हे स्वप्न दाखवले. शहरातील तिन्ही जागा जिंकल्याने त्याचा भाजपला फायदाही झाला. मात्र, त्यासाठी आवश्‍यक तयारी, निधीची तरतुद झालीच नाही. या योजनेमुळे महापालिकेवर कोट्यावधींचा भार पडणार आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी महापौरांना छगन भुजबळांचे उंबरे झिजवण्याची वेळ आली. 

यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी मोठे प्रकल्प करण्याआधी स्वच्छता, डास निर्मूलन, पथदिप, चांगली उद्याने ही मूलभूत कर्तव्यांकडे लक्ष द्या अशा कानपिचक्या महापौरांना दिल्या. शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मागील सरकारने टायरबेस मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिली. स्थानिक भागधारक म्हणून महापालिकेला 102 कोटी रुपये तसेच शहर बससेवेसाठी होणारा वार्षिक तोटा भरून काढण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. पालकमंत्री भुजबळ यांच्या निवासस्थानी सोमवारी महापौर कुलकर्णी यांच्यासह सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील यांनी भेट घेतली. 

पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी विविध मुद्यांवर चर्चा झाली. वाढत्या लोकसंख्येनुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टायरबेस मेट्रो प्रकल्प नाशिकमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला होता. देशातील हा पहिलाच प्रकल्प असून, त्यासाठी दोन हजार 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण होणार असून, त्यासाठी कंपनी संपूर्ण खर्च उचलणार असली तरी स्थानिक भागीदार म्हणून महापालिकेला 102 कोटी रुपये अदा करावे लागणार आहेत. प्रकल्पासाठी महापालिका जागा देणार असल्याने 102 कोटींचा बोजा कमी करण्यासाठी महापालिकेला अनुदान मिळावे, तसेच महापालिकेच्या प्रस्तावित शहर बससेवेचा तोटा लक्षात घेता दर वर्षी होणारे नुकसान शासनाने भरून देण्याची मागणी करण्यात आली.

तत्कालीन सरकारकडे मागणी का नाही?

शासनाने शहर बससेवा व टायरबेस मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देताना नाशिककरांना विश्‍वासात घेतले नाही. प्रकल्प मंजूर करताना महापालिकेवर आर्थिक भार पडणार ही बाब त्यावेळच्या शासनकर्त्यांना माहिती होती. परंतु, आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून शासनावर आर्थिक भार टाकण्याची मागणी अचंबित करणारी ठरली आहे. भाजपच्या सत्ताकाळातील पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे अशा प्रकारची मागणी का केली नाही, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आल्याचे समजते. 

महापालिकेने टायरबेस मेट्रो, शहर बससेवा प्रकल्प हाती घेतले खरे; परंतु मोठे प्रकल्प राबविण्यापूर्वी व्यवहार्य ठरू शकतात का याचा विचार व्हायला हवा, असा सल्ला देत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वच्छता, डास निर्मूलन, चांगली उद्याने व पथदीप या महापालिकेच्या मूलभूत कर्तव्यांकडे लक्ष वेधत कानपिचक्‍या दिल्या. त्यामुळे फडणवीसांचे स्वप्न पुर्ण होणार की हवेतच राहणार हा भाजपसाठी चिंतेचा, राजकीय विरोधकांत चर्चेचा विषय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com