Nashik Maratha Meeting Shivaji Sahane looses cool | Sarkarnama

'15 लाखांत मराठा समाज विकत घेतला काय?' या प्रश्‍नाने शिवाजी सहानेंचा तोल सुटला! 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीची बैठक शुक्रवारी झाली. खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी महापौर प्रकाश मते, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, समन्वयक चंद्रकांत बनकर यांसह जिल्ह्यातील शंभराहून अधिक नेते, मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

सिन्नर : "आपण दहा, पंधरा लाख दिले. मात्र मलाच निमंत्रण नाही. परस्पर निर्णय होतात. हा काय प्रकार आहे?" असा प्रश्न शिवसेनेतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले शिवाजी सहाने यांनी केला आणि नंतर त्यावरुन चांगलाच वाद झाला. विशाल बनकर या युवकाने त्यांना "पंधरा लाख दिले म्हणजे मराठा समाज विकत घेतला काय?," असा प्रतिप्रश्‍न केल्याने दोन्ही नेत्यांत शाब्दीक चकमक, हमरी तुमरी अन्‌ नंतर बैठकीतच चक्क झोंबाझोबी झाली. त्यामुळे मराठा समाजाच्या ज्येष्ठांच्या बैठक चांगलीच गाजली. 

सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीची बैठक शुक्रवारी झाली. खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी महापौर प्रकाश मते, माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, समन्वयक चंद्रकांत बनकर यांसह जिल्ह्यातील शंभराहून अधिक नेते, मान्यवर या बैठकीला उपस्थित होते. शांततेत ठिय्या आंदोलन होत असतांना एका गटाने तोडफोड केली. त्यावर चर्चा सुरु होती. 

यावेळी नुकतेच शिवसेनेतुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले शिवाजी सहाने यांनी माईक हातात घेऊन आक्रमक रुप धारण केले. "यापूर्वीची बैठक कोणी बोलावली? मला निमंत्रण का नव्हते. मोर्चा निघाला तेव्हा मी पंधरा लाख रुपये दिलेत. मात्र मलाच निमंत्रण नव्हते." असे सांगत सहाने यांनी विविध तक्रारी सुरु केल्याने बैठकीचा नुरच पालटला. त्यामुळे अनेक नाराज झाले. सहाने यांच्या शेजारी बसलेले विशाल बनकर यांनी "पंधरा लाख दिले म्हणजे मराठा समाज विकत घेतला काय? पैशाची मिजास दाखवु नका. इथे सर्व सारखेच आहे. कुणी लहान मोठे नाही," असे सांगत हस्तक्षेप केल्याने या दोघांत चांगलीच जुंपली. 

अगदी शाब्दिक बाचाबाची व नंतर झटापटीची वेळ आली. अखेर इतरांनी हस्तक्षेप करुन दोघांना बाजुला नेले. मात्र, त्यानंतर सगळ्यांनीच त्यावर नाराजी व्यक्त केल्याने केवळ शहरातच नव्हे तर राज्यस्तरीय समितीपर्यंत त्याची चर्चा पोहोचली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख