शिवसेनेच्या बबन घोलपांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीच्या भुजबळांकडून सुरुंग ?

देवळाली... कित्येक वर्षांपासून शिवसेना नेते तथा माजी मंत्री बबन घोलप यांचा बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच झुंजविले. अंतर्गत धुसफुशीचा लाभ घेत राष्ट्रवादीने देवळालीतील ग्रामीण भाग पोखरला. देवळाली कॅम्पला शिवसैनिकांकडून अपक्ष अॅड. माणिकराव कोकाटे यांनाही या वेळी उघडपणे रसद पुरविली गेल्याने शिवसेना सावध झाली आहे.
Baban Gholap - Samir Bhujbal
Baban Gholap - Samir Bhujbal

नाशिक : देवळाली... कित्येक वर्षांपासून शिवसेना नेते तथा माजी मंत्री बबन घोलप यांचा बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच झुंजविले. अंतर्गत धुसफुशीचा लाभ घेत राष्ट्रवादीने देवळालीतील ग्रामीण भाग पोखरला. देवळाली कॅम्पला शिवसैनिकांकडून अपक्ष अॅड. माणिकराव कोकाटे यांनाही या वेळी उघडपणे रसद पुरविली गेल्याने शिवसेना सावध झाली आहे. 

जिल्हा परिषदेचे चार गट, महापालिकेचे तीन प्रभाग, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड, भगूर पालिकेसह सत्तरहून अधिक गावांचा समावेश असलेला देवळाली मतदारसंघ आहे. मराठा, दलित, आदिवासींसह विविध अमराठी भाषिकांचा समावेश असलेला हा संमिश्र भाग आहे. गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून शिवसेनेचा या मतदारसंघावर प्रभाव राहिला आहे. मात्र वर्षानुवर्षीच्या एकांगी राजकारणामुळे साचलेपण आणि शिवसेनेतील नवोदितांच्या अपेक्षा पूर्ण करताना निष्ठावंतांना डावलणे, यातून कट्टर शिवसैनिक व इतर पक्षांतून आलेले उपरे असा उघड संघर्ष वाढत चालला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यातील स्पर्धेमुळे संघर्ष गेल्या पाच वर्षांत टोकदार बनला. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला दुहीने दुभंगत चालला आहे. 

ग्रामीण भागातूनच सुरुंग
जिल्हा परिषदेचे एकलहरे, गिरणारे, गोवर्धन आणि पळसे असे चार गट आहेत. पूर्व पट्ट्यातील पळसे व एकलहरे गटात शिवसेनेचा वरचष्मा, तर पश्‍चिम पट्ट्यातील गोवर्धन, गिरणारेत राष्ट्रवादीचा प्रभाव हे पारंपरिक समीकरण पाच वर्षांत बदलले. एकलहरेत खासदार गोडसे यांच्या पुत्राच्या उमेदवारीच्या हट्टामुळे एकलहरे गटातील शिवसेनेच्या जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांचा गट फुटला. कालांतराने हा गट शिवसेनेच्या ताब्यातून शिवसेनेच्या बंडखोरांच्या ताब्यात गेला. सिद्धपिंप्रीपासून तर पळसे, लहवितपर्यंतची शिवसेनेची ताकद क्षीण होत आहे.

आता पळसे गटही शिवसेनेच्या हातून गेला. दुर्दैव म्हणजे, शिवसेनेतील अंतर्गत राजकारण हेच शक्तिक्षीण होण्यामागचे प्रमुख कारण आहे. शिंदे, नाणेगाव, लहवितपासून तालुक्‍यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या एकलहरेसारख्या अनेक गावांतून शिवसेनेला आव्हान वाढू लागले आहे. भगूर पालिकेत एकहाती सत्ता असूनही जिल्हाप्रमुखांच्या गावात सोमवारी (ता. 29) गायकवाड गल्लीसह अनेक बूथवर अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या बूथवर शिवसेनेतील नाराजांचा राबता बराच बोलका होता. 

भाजप, वंचित आघाडीमुळे लाभ
महापालिका क्षेत्रातील शहरी भागावर शिवसेनेचा बऱ्यापैकी वरचष्मा आहे. मात्र, तेथे भारतीय जनता पक्षाने शिरकाव करत नाशिक रोड महापालिका विभागात आणि कॅन्टोन्मेंट बोर्डात सत्ता काबीज केली. शिवसेना म्हणून तशी शहरी भागात पूर्वीसारखी राहिलेली नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची भाजपशी युती असल्याने देवळाली मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला बरेच तारले. तशीच अप्रत्यक्ष मदत वंचित बहुजन आघाडीमुळे झाली.

आतापर्यंत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत असणारा मतदारसंघातील ३५ टक्‍क्‍यांच्या आसपासचा दलित समाज या वेळी प्रथमच वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली एकवटला. शिवसेनेला प्रत्यक्ष नसला तरी कॉंग्रेस आघाडीला मदत न झाल्याचा अप्रत्यक्ष लाभ शिवसेनेला झाला. भाजपची मदत वंचित आघाडीचे एकीकरण या बाबी शिवसेनेच्या पथ्यावर पडल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com