राष्ट्रवादीतील नाराज गटानेच उडविली जिल्हाध्यक्षांची दांडी - Jalgaon NCP district president Ravindra patil defeated in own village | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीतील नाराज गटानेच उडविली जिल्हाध्यक्षांची दांडी

कैलास शिंदे
सोमवार, 18 जानेवारी 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांच्या मनुर बुद्रूक गावात त्यांचे बंधू पंजाबराव पाटील यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला आहे. पाटील यांचे पुतणे सागर पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांच्या मनुर बुद्रूक गावात त्यांचे बंधू पंजाबराव पाटील यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला आहे. त्यांचे पुतणे सागर पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गटाच्या महाविकास आघाडीनेच पाटील यांना दणका दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांचे बोदवड तालुक्यात मनुर बुद्रूक हे मुळगाव आहे. त्यांचे बंधू पंजाबराव पाटील यांची ग्रामपंचायतीवर सत्ता आहे. यावेळीही त्यांच्यातर्फे पॅनल उभे करण्यात आले होते. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच नाराज गटाने महाविकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून ही निवडणुक लढविली. राष्ट्रवादीमधील दोन गटांतच ही निवडणुक होणार असल्याने रंगत वाढली होती.

निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागल्यानंतर पाटील यांना मतदारांनी नाकारलेचे चित्र दिसून आले. निवडणूकीत पॅनल प्रमुख पंजाबराव पाटील यांचे चिरंजीव व रविंद्र पाटील यांचे पुतणे सम्राट पाटील हेही आपले नशीब आजमावत होते. मात्र, महाविकास आघाडीच्या पॅनलचे उमेदवार सागर प्रभाकर पाटील यांनी त्यांचा धक्कादायक पराभव केला. तसेच एकुण 11 जागांपैकी केवळ एका जागेवरच पाटील यांच्या पॅनेलला यश मिळविता आले.

गावातच दहा जागांवर धुव्वा उडाल्याने जिल्हाध्यक्ष पाटील यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गावातच उफाळून आलेली नाराजी दुर करण्यात पाटील यांना आलेले अपयश आणि झालेल्या पराभवाची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

आमदार मिटकरी यांचे वर्चस्व

अकोला जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या अकोट तालुक्यातील कुटासा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी वर्चस्व मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने 13 पैकी 10 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे.

मिटकरी यांचे हे गाव असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आमदार रणधीर सावरकर यांनी त्यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. मिटकरींनी कुटासा गावाच्या निवडणुकीत सर्व 13 जागांवर उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलशिवाय इतर तीन पॅनलही रिंगणात आहेत. 

माजी मंत्री राम शिंदे यांच्या गावातच भाजप पराभूत

माजी मंत्री भाजप नेते राम शिंदे यांच्या चौंडी गावात भाजपच्या पॅनलचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ पैकी सात जागा जिंकत सत्ता परिवर्तन केले. हा राम शिंदेंना मोठा धक्का मानला जात आहे. आमदार रोहित पवार यांचे जामखेड तालुक्यातील वर्चस्व वाढत असल्याचे या निकालांमुळे स्पष्ट होत आहे.

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख